‘कभी हा तर कभी ना’ च्या चक्करमध्ये सामान्य जनतेची ससेहोलपट
नव्या आर्थिक समस्यांनी गावकरी त्रस्त
सुशील ओझा, झरी:- तालुक्याचा बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेवेने ग्राहकांची चांगलीच पायपीट वाढविली आहे. बँक ग्राहकांना सेवा देणारी एटीम सेवा सध्या ‘कभी हा तर कभी ना’ या परिस्थितीत पडल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुकुटबन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेने मागील पाच ते सात वर्षांपासून बँक ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक गती मिळावी व बँक व्यवहार अधिक सुरळीत व्हावा या दृष्टिने ग्राहकांच्या सेवेकरिता एटीम सेवा मुकुटबन, झरी, पाटण, येथे सुरू केली. ही सेवा मागील बऱ्याच दिवसापासून ग्राहकांना ‘कभी हा तर कभी ना ‘या प्रमाणे सेवा देत आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना थेट बँकेत लाईन मध्ये तासनतास उभे राहावे लागत आहे. यात ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
चोवीस तास सेवा देण्याची तयारी दाखविणारी एटीम सेवा सध्या ग्राहकांच्या सेवेत असमर्थ झाली असल्याचे दिसत आहे. तर बँकेत कधी लिंक राहत नसल्याने बरेचदा ग्राहकांना पैशाअभावी रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तालुक्यात बाहेर गावावरून आलेल्या बँक ग्राहकांची एटीएमशिवाय पर्याय नसल्याने त्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे. एटीएमच्या चालू, बंद या अवस्थेमुळे ग्राहकांची मोठी निराशा होत आहे. दररोज एटीमसेवेकडे ग्राहकांची रीघ लागलेली असते. बाहेरगावचे ग्राहक स्थानिक लोकांकडे एटीएम संदर्भात विचारणा करताना दिसत आहेत.
मुकुटबन ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तर स्टेट बँक , मध्यवर्ती बँक , विदर्भ कोकण क्षत्रिय ग्रामीण बँक आणि दोन ते तीन खाजगी बँक आहेत. मात्र येथे केवळ स्टेट बँकेचेच एटीएम कार्यरत आहे.
हेसुद्धा नियमित सुरू राहत नसल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता मोठी अडचण निर्माण होते.
सध्या लग्नसराई असल्याने वधूवरांचे कुटुंबीय पैसे काढण्यासाठी रोजच बँकेत चकरा मारत आहेत. अनेकजण पैशाची जुळवाजुळव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर बँकेने एटीम सेवा नियमित करावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहेत.