विलास ताजने, वणी: शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन यात एकाने सत्तुरने हल्ला केल्यामुळे चार जण जखमी झाल्याची घटना दि. १९ मंगळवारी दुपारी वणी तालुक्यातील चारगाव येथे घडली. सदर घटनेची फिर्याद नजमा परवीन शेख यांनी शिरपूर पोलिसांत दिली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चारगाव (चौकी) येथे नजमा परवीन शेख (वय ३२) या महिलेचा चहा कॅन्टीनचा व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या शेजारीच राजू अन्सारी यांचा वाहन पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या दोन्ही कुटुंबात पैस्यांच्या देवाणघेवाणी वरून वाद झाला होता. सदर वादात गुन्हाही नोंद झाला होता. मात्र १४ मार्चला पुन्हा वाद निर्माण झाला. याप्रसंगी राजू अन्सारी याने नजमा परवीन शेखचा मुलगा अजरुद्दीन याला मारून टाकण्याची धमकी दिली होती,असा आरोप आहे.
मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान नजमा शेख यांचे व्यवसायाने ट्रक चालक असलेले भाचे मुजाहिद खान मुजफ्फर खान वय २४, साजिद खान सरफराज खान वय २४, दोघेही रा. तळेगाव ता. दारव्हा आणि मोसिन खान खलील खान वय २६, अजीम खान खलील खान वय २८ दोघेही रा. बोरी अरब ता. दारव्हा हे सर्व चंद्रपूर येथे ट्रक घेऊन जाताना चहा घेण्यासाठी नातेवाईक असलेल्या नजमा शेख यांच्या कॅन्टीनवर आले.
यावेळी नजमा परवीन शेख यांचा मुलगा अजरुद्दीन याने शेजारी राहणारा राजू अन्सारी हा नेहमी आमच्या सोबत वाद करतो. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली असल्याचे त्यांना सांगितले. परिणामी सदर प्रकरणाबाबत राजू अन्सारी यांची समजूत घालण्यासाठी सर्व ट्रक चालक पाहुणे अन्सारी यांच्या दुकानात गेले. यावेळी शाब्दिक वाद सुरू असताना समीर राजू अन्सारी याने टायर कापण्याच्या सत्तुरने वार करून सर्वांना जखमी केले.
सदर हल्ल्यात अजीम खान खलील खान हा गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींना वणी येथून चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सतिश चवरे, पोलिस उपनिरीक्षक सतिश दोंकलवार आणि शिरपूर पोलिस करीत आहेे.