यवतमाळच्या पत्रकाराला वणी पोलिसांची धक्काबुक्की
अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष तर सर्वसामान्यांकडे चांगलेच लक्ष
विवेक तोटेवार, वणी: एका वृत्तवाहिणीचे जिल्हा प्रतिनिधी वणीमध्ये एक बातमी करण्यासाठी आले असता त्यांच्यावर वणी पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांनी हुज्जत घातली. तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा परिसरातून सर्व स्तरातून निषेध केला जातोय.
श्रीकांत राऊत हे झी 24 तास या वृत्तवाहिणीचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. सोमवारी वणीमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा निघाला. या बातमीच्या वृत्तांकनासाठी श्रीकांत राऊत हे त्यांच्या सहकारी कॅमेरामन नितीन राऊत यांच्यासह वणीत आले होते. ते दोघे वणी पोलीस स्थानकाच्या फलकाचे चित्रिकरण करीत असताना डीबी पथकातील रत्नपाल मोहाडे व दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी तिथे चित्रीकरणावरून प्रतिनिधींसोबत हुज्जत घातली तसेच त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.
गेल्या काही दिवसांपासून वणी पोलीस ठाणे वादग्रस्त ठरताना दिसत आहे. दहा दिवसांआधीच वणीतील तत्कालीन ठाणेदार ‘प्रीत’भ-या प्रकरणात अडकले. त्यामुळे वणी पोलीस ठाण्याची पत चांगलीच गेली. त्याआधी पेढे वाटले म्हणून काही लोकांना पोलीस ठाण्यात डांबण्यात आले होते. तसेच एखादे सराईत गुन्हेगार असल्यासारखे बाहेरून ठाण्याचे गेट देखील लावण्यात आले. या प्रकरणात वणीतील एका प्रतिष्ठित वकिलालाही आधी बंद करून ठेवले होते. मात्र नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या घटनेची शाई वाळत नाही तोवर आता एका पत्रकाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाबाबत एसडीपीओ लगारे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. अशी माहिती श्रीकांत राऊत यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली.
वणी पोलीस ठाणे सध्या चांगलेच वादग्रस्त ठरत आहेत. अवैध धंद्यांनी परिसरात उच्छाद मांडला आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. तर सर्वसामान्य लोकांवर मात्र चांगलेच लक्ष आहे. काही दिवसांपासून पोलीस कर्मचारीही चांगलेच वादात सापडताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा महिन होत आहे. पत्रकाराला झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा वणीतील पत्रकारांकडून निषेध करण्यात येत असून दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.