बहुगुणी डेस्क, वणी: पैसे उधार मागताना अगदी नम्रपणे मागितले जातात. मात्र पैसे परत मागितल्यावर त्यांच्यातली नम्रता नष्ट होऊन त्याची जागा एक बब्बर शेर घेतो व उधार घेतलेला गब्बर सिंग बनतो. केवळ पैसे परत मागितल्यामुळे उधार देणा-यांनाच मारहाण देखील करण्यात येते. अशीच एक घटना वणीतील प्रेमनगरमध्ये घडली. उधारीचे पैसे मागितल्याने एकाने चिडून बियरच्या बॉटलने तोंडावर हल्ला केला. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांआधीच उधारीचे पैसे मागितल्याने आणखी एक मारहाणीची घटना घडली होती. त्यामुळे आता ‘दान’शुरांना पैसे उधार द्यायेच की नाही, असा प्रश्न पडला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी हा मुळचा हैदराबाद असून सध्या रविनगर वणी येथे राहतो. आरोपी तरुण (28) देखील त्याच्याच वार्डातील रहिवासी आहे. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख आहे. 15-20 दिवसांआधी आरोपीने फिर्यादीकडून काही दिवसांच्या अवधीवर 5 हजार रुपये उसणे घेतले होते. शनिवारी दिनांक 14 जून रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रेमनगरमध्ये होता. तिथे त्याला आरोपीची पत्नी भेटली. त्यामुळे फिर्यादीने त्याला तुझा पती कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर तिने तिचा पती काही वेळातच येथे येणार आहे, असे सांगितले.
दरम्यान काही वेळात आरोपी तरुण तिथे दारुच्या नशेत पोहोचला. त्याने फिर्यादीला विचारणा केली की तू माझ्या पत्नीशी काय बोलला? तू इथे कसा आला? असा जाब विचारू लागला. त्यावर फिर्यादीने उधारीचा विषय काढला. त्यावर तुझे कशाचे पैसे असे म्हणत त्याच्या हाती असलेली बिअरची बॉटल फिर्यादीच्या तोंडावर मारली. या हल्ल्यामुळे फिर्यादीचे ओठ फुटले. तसेच गालावर मार लागला.
पुन्हा जर उधारीचा विषय काढला तर जिवे मारील अशी धमकी देत फिर्यादीला शिविगाळ केली. फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी तरुणावर बीएनएसच्या कलम 118 (1), 352, 351(2) 351 (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.