पुष्पा आत्राम यांचे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर
'गोंडण' या ग्रंथातून उलगडणार पुष्पाताईंची संघर्षगाथा
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध सामाजिक परिवर्तन चळवळीच्या अग्रणी नेत्या पुष्पा आत्राम यांचे ‘गोंडण’ हे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लवकरच ते वाचकांच्या हातात येईल, असे ‘गोंडण’ प्रकल्पाचे संयोजक कृष्णकुमार चांदेकर व विद्रोही कवी विलास थोरात यांनी कळविले आहे.
या प्रकल्पाचे संयोजक कृष्णकुमार चांदेकर म्हणतात, की सामाजिक चळवळीतून पुष्पाताईसोबत विविध कामं केलीत. त्यांचं कार्य जवळून पाहिलं. अनुभवलं. त्यामुळे त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक निघावं ही आमची इच्छा होती. त्यामुळे सहसंयोजक विलास थोरात आणि आम्ही मिळून या प्रकल्पाला सुरूवात केली.
येथील प्रसिद्ध समाजसेविका पुष्पाताई आत्राम ह्या गत अनेक वर्षांपासून समाज सेवेची धुरा सांभाळीत आहेत.
त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासीसेवक पुरस्कारही प्राप्त झालाय. त्यांनी विविध सामाजिक व राष्ट्रीय पक्षांची मानाचे पदे भूषविलीत. अनेक मातब्बर पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
वयाची 72 वी ओलांडलेल्या पुष्पाताई यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांना वाचायला मिळणार आहे. सदर पुस्तक प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. नजीकच्या काळात हा प्रकाशन सोहळा आयोजित केला जाईल, असे कृष्णकुमार चांदेकर यांनी कळविले.
नात्यातील चंद्रभागाबाई ह्या पुष्पाताईंना ‘गोंडण’ म्हणायच्या. पुष्पाताई ह्या माहेरच्या कुमरे. जुनी प्रथा अशी होती की, बरेच लोक हे खऱ्या नावाने न बोलवता टोपण नावाने बोलायचे. हीच प्रेरणा घेऊन त्यांनी पुस्तकाला ‘गोंडण’ हे शीर्षक दिलं. पुष्पाताईंचे पती पुंडलिकजी ह्यांचा त्यांना नेहमीच सपोर्ट राहिला. मोठी मुलगी कविता, मुलगा वैभव आत्राम आणि राहुल हेदेखील त्यांची प्रेरणा घेऊन विविध सामाजिक चळवळीत सक्रिय असतात.
मुलगी कविता आत्राम ह्या आकाशवाणीच्या धुळे केंद्रात उद्घोषिका आहेत. वैभव आत्राम हे वरिष्ठ तुरुंगअधिकारी आहेत चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे. तर राहुल आत्राम हे प्रसारण अधीकारी आकाशवाणी केंद्र नांदेड येथे.
वैभव आत्राम आईच्या कार्याबद्दल भरभरून बोललेत. लहानपणापासूनच आईंचं कार्य आम्ही पाहत आहोत. वणीतील गोकुळनगरात आई गरीब मुलांसाठी मोफत अंगणवाडी चालवाच्या. ती परंपरा आजही सुरू आहे. मीदेखील तिथे शिकवायला जायचो. आई मला विविध सामाजिक उपक्रमांना सोबत न्यायची. त्यामुळे चळवळ काय असते हे मी बालवयातच समजून घ्यायला लागलो. आईला वाचनाची आवड आहे. ती आईमुळेच आम्हा भावंडांनाही लागली. आम्हा भावंडांच्या जडणघडणीत आईची खूप मोठी भूमिका आहे. आईचं आत्मकथन ग्रंथरूपात येत आहे. यात बऱ्याच अनटोल्ड स्टोरीज आहेत. वाचकांसह आम्हालादेखील याची उत्सुकता लागली आहे.
वैभव आत्राम, तुरुंगाधिकारी