बचतगटांच्या महिलांच्या मोर्चाने दणाणले वणी शहर

विविध मागणींसाठी महापरिषदेचे आयोजन

0 298

निकेश जिलठे, वणी: महिला बचतगटांची संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी वणीमध्ये काढण्यात आलेल्या महिलांच्या महामोर्चाने वणी शहर दणाणले. सुमारे 4 हजार महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ‘बचत गटांचे कर्जमाफ झालेच पाहिजे’, ‘नारीशक्तीच्या विजय असो’ असे नारे यावेळी लावण्यात आले. एसडीओंना निवेदन सादर करून या महापरिषदेची सांगता झाली. डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात व निलीमाताई काळे यांच्या मार्गदर्शनात ही महापरिषद घेण्यात आली.

सध्या महिला बचतगटांची परिस्थिती हालाखिची आहे. सरकारच्या चुकीचा धोरणांचा फटका सर्वसामान्यांसोबतच महिला बचत गटांनाही बसला आहे. महिला बचत गटाचे कर्ज माफ करावे, राष्ट्रीयकृत बँकांद्वारे बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा, महिला बचत गटांना स्वयंरोजगार व लघुउद्योगासाठी प्रशिक्षण द्यावे, खासगी बँकांची सक्तीची कर्जवसुली थांबवावी, बचत गटासाठी पंतप्रधान मुद्रा लोनची कडक अंमलबजावणी करून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करावे अशा विविध मागण्या घेऊन वणीमध्ये दिनांक 9 सप्टेंबरला दुपारी 11 वाजता शासकीय मैदान येथे महिला महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या महिपरिषदेत व्यासपीठाला महिलापीठ हे नाव देण्यात आलं होतं. यावेळी राधाबाई लिखेवार, विजयाताई आगबत्तलवार, आशाताई टोंगे, शारदाताई यांची महिलापीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधताना निलीमाताई काळे म्हणाल्या की बचत गट म्हणजे केवळ पैशांची बचत करणे एवढेच नाही, तर महिलांच्या हातांना काम मिळवून देणे आणि स्वमिळकतीतील आत्मसन्मान मिळवून देणे हा ही आहे. मात्र आज बचतगटाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम महिलांच्या आर्थिक घडीवर पडला आहे.

यावेळी बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की महिला बचत गट ही केवळ कागदावरील शासकीय योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. महिला बचत गटामुळे कित्येक स्त्रियांना आत्मसन्मान मिळाला आहे. मात्र सरकार आज बचतगटांकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकार एकीकडे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे कर्ज माफ करत आहे. तर दुसरीकडे खेडोपाडी काम करणा-या महिला बचतगटांसाठी मात्र सक्तीने कर्जवसुली करत आहे. बँक बचत गटांच्या महिलांना कर्ज देण्यास टाळाटाळ करते.

महापरिषदेला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील महिला बचत गटाच्या प्रमुख उपस्थित होत्या. महापरिषदेनंतर महामोर्चाला सुरूवात झाली. हा महामोर्चा शासकीय मैदानापासून सुरू झाला. खाती चौक, गांधी चौक, जत्रा रोड, टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करीत याचा शेवट तहसिल कार्यालयाजवळ झाला. यावेळी महिलांद्वारे एसडीओंना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या महापरिषदेच्या यशस्वीतेसाठी जिजाबाई कोयचाडे, रेखाताई दडांजे, सुरेखाताई आत्राम यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, स्वप्निल धुर्वे, अंकुश माफुर, महेश पिदूरकर, सोनू निमसटकर, मारोती मोहाडे व वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

Comments
Loading...