वणी आगारात अर्ध्या बसेसची अवस्था बिकट, विद्यार्थ्यांना त्रास

खनिज विकास निधीतून 25 बसेस देण्याची विजय पिदूरकर यांची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी डेपोतील अर्ध्या पेक्षा अधिक बसेसची अवस्था बिकट असून आगाराला नवीन 25 बसेची आवश्यकता आहे. सध्या वणीला येणा-या प्रवाशांपैकी 25 टक्के प्रवासी हे विद्यार्थी आहेत. बसेसची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून प्रसंगी त्यांना आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. त्यामुळे खनिज विकास निधीतून तात्काळ बसेस द्याव्या, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.

वणी आगारात सध्या 38 बसेस असून यामध्ये 12 मानविकास मिशन अंतर्गत आहेत. तर उर्वरित 26 बसेस पैकी 15 बसेस या वयोमान व मर्यादेपेक्षा जास्त किलोमीटर धावल्याने त्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सध्या वणी आगारात केवळ 11 बसेस चांगल्या स्थितीत आहे. वणी आगारातुन तीनही तालुक्यात रोज अंदाजे 15 हजार प्रवासी प्रवास करतात. त्यात सुमारे 3500 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आगारापासून शेवटचे गाव 35 ते 40 कि.मी. दूर आहे. तालुक्याच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय, आय. टी. आय., टायपिंग, संगणक क्लास इ. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी वणीला येतात. मात्र बसेचची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

खनिज विकास निधीतून बसेस द्या..
वणी, झरी, मारेगाव येथील खनिज संपतीमुळे जिल्हा राज्य व केंद्र यांना मोठ्या प्रमाणात रॉयल्टी मिळते. खाण बाधित प्रकल्पग्रस्त नागरीकांच्या जमिनी खनिज संपदेसाठी शासन व खासगी कंपनीला दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनास स्वामित्वधन प्राप्त होत आहे. त्यामुळे खाणबाधीत प्रकल्पग्रस्त नागरीकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तात्काळ 25 बसेस द्याव्या. अशी मागणी विजय पिदूरकर यांनी केली आहे. 

कत्तलीसाठी नेणा-या 49 जनावरांची सुटका, खरबडा बनला तस्करीचा अड्डा

सर्वसामान्यांना माती मिश्रीत रेती तर चांगली रेती अधिक पैसे देणा-याच्या घशात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.