मतदानाचा अधिकार
संदीप गोहोकार : मतदानाचा अधिकार आपण कशाप्रकारे वापरतो त्यावर आपलं आणि देशाचं भविष्य ठरेल. लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेला मतदानाचा अधिकार ज्यामध्ये लोकांच्या मार्फत लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. त्यांच्यामार्फत राज्यकारभार केला जातो. अप्रत्यक्षपणे लोकांच्या हातात राज्यकारभाराचा अधिकार आहे. यामध्ये सर्व व्यक्तींच्या मताची (vote) किंमत सारखी असून प्रत्येक व्यक्तीचं मत(vote) अमूल्य आहे. या अधिकाराच्या पाठीमागे मोठ्या संघर्षाची मालिका आहे .
एक काळ होता शस्त्राच्या जोरावर राज्य स्थापन व्हायचे. ज्या व्यवस्थेत सामान्य जनतेला गुलामापलीकडे वागणूक दिली जात नव्हती. हक्क, अधिकार तर सोडाच साधं जीवन जगणेही कठीण होत. मग तो अमेरिकेच्या गुलामांचा इतिहास असो, युरोपातील वर्गवाद असो, की आपल्याकडील जातीव्यवस्था असो. ही सर्व व्यवस्था धार्मिकतेच्या पाठबळामुळे मजबूत झाली होती. जेव्हा धर्म व राज्याचे कायदे एकपल्ल्यानी चालतात तेव्हा व्यवस्था ही पोलादी पकड घेते. ज्या मध्ये कसलेही हक्क अधिकार असत नाही. अधिकार एका हाती केंद्रीत असतात आणि जनतेच्या मताचं काही मूल्य नसते. ती राजेशाही ठरते आणि ही व्यवस्था मजबूत होत जाते.
व्हिक्टर ह्यूगो म्हणतो “कायदे आणि परंपरेच्या परिणामी समाजात एक अशी अधोगती अवस्था राहील ज्यामध्ये संस्कृतीच्या पोटात नरकाची निर्मिती होत राहील”. त्या काळी मनुष्यावर लादण्यात आलेले नियम कोणीतरी दुसरा वर्ग तयार करीत होता. राज्यकारभारावर लोकांचं नियंत्रण नव्हतं. कोणत्याही लोकांचे हीत विचारात न घेता राजा आणि काही मोजके कारभारी म्हणतील त्याप्रमाणे कारभार चालायचा. कारण या व्यवस्थेत मतदानाचा अधिकार नव्हता, संविधान नव्हतं.
सामान्य जनतेत हक्क, अधिकाराविषयी प्रबोधन होत गेलं आणि काळ बदलला. क्रांती युग आलं. वर्षानुवर्षे अन्याय, शोषण झालेल्या समाजातून हक्क अधिकाराचा आवाज ऐकू येऊ लागला. सामाजिक क्रांतीची मागणी सगळ्याच देशात जोर पकडत होती. हा आवाज बहिऱ्या राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत पोहचण्यासाठी अपरिहार्य पर्याय म्हणून बॉम्ब व बंदुका पुढे आल्यात. हाता-हातात शस्त्र दिसत होते. कोणताही मार्ग नसल्याने क्रांतीसाठी लोक जीव द्यायला तयार झाले. जेणेकरून एका चांगली लोककेंद्रित व्यवस्था यावी. भगतसिंग यांनी असेम्ब्लित बॉम्ब टाकला तेव्हा उद्गार काढले होते “बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज भाजते”
याही काळात व्यवस्था तशीच होती. फक्त लोकांला अधिकाराची, शोषणाची जाणीव होऊन ते बंड करून उठले होते. ज्यासाठी एवढा मोठा संघर्ष होता, तोच मतदानाचा अधिकार! क्रांतिकारक मंडळी म्हणायचे ” कसं लढायचं हे राज्यकर्ते ठरवितात. मतपेटीतून लढू दिलं तर ठीक नाही तर शस्त्राने लढू ” हाही काळ गेला. लोकशाही व्यवस्था आली.
या लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार सर्वसामान्य लोकांना मिळाला. ही लोकशाही व्यवस्था आणि मतदानाचा अधिकार मोठ्या संघर्षातून मिळाला आहे. तो वाया जाऊ देऊ नका. मी वाया जाऊ देणाऱ्याचा अर्थ असा घेतो की आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीपासून आपले कोणते प्रश्न मार्गी लागणार आहे किंवा कोणते प्रश्न मार्गी लागले आहे यावर ठरवितो.
संसदेत जे काही कायदे होणार त्याचं आपल्याला पालन करावं लागते. त्याचा परिणाम आपल्यावर होणार. भीषण बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हा कशाचा परिणाम आहे, कायद्याच्या बाजूने किंवा विरुद्ध मतदान करण्याचा, बोलण्याचा अधिकार आपल्या वतीने आपल्या प्रतिनिधीला असतो.
आणखी महत्वाचं म्हणजे, सत्तेत वाटप करण्याचा अधिकार असतो. ज्ञान, सत्ता, धन हे लोकांपर्यंत कस पोहोचवायचं हे सत्ता ठरविते. आपण म्हणू शकतो का? की तळागळातील सर्व लोकांपर्यंत ज्ञान, सत्ता, धन पोहचलं. या तर बाबी सोडाच; पण संविधानात लिहिलेल्या मूलभूत बाबींची तरी पूर्तता झाली का? अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य, शिक्षण लोकांपर्यंत पोहचलं का? हे सगळं सत्ता ठरविते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, “संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला राबविणारे राज्यकर्ते लोक नालायक असतील तर याचा काही उपयोग होणार नाही”
लक्षात घ्या राज्यकर्ते निवडून देण्याचा अमूल्य अधिकार आपल्या जवळ आहे. आपण कशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी निवडून पाठवितो, त्यानुसार आपल्याला फायदे मिळणार आहे. आपले प्रश्न मार्गी लागणार आहे. म्हणून सर्व माझ्या भावांनो अफवेच्या, कोणत्याही लाटेच्या आधारावर मतदान (vote) करू नका. विचार करा पक्षामार्फत एक वातावरण तयार केले जाते. साध्या-साध्या गोष्टी वारंवार सांगून एक हवा तयार केली जाते. भावनिक मुद्दे सर्व साधनांचा वापर करून रेटले जातात. त्यातून भीड तयार होते. त्या भिडचं वातावरण नियंत्रित केलं जाते. आपण एवढ्या मोठ्या भिडकडे पाहून, हवेच्या आधारावर तर मतदान करीत नाही आहोत ना? आपण व्यक्ती न पाहता पक्षावर, पक्षाच्या प्रचाराला भुलून मत देत तर नाही आहोत? याचा विचार करावा! या सर्व बाबींचा ठरविण्याचा अधिकार सत्तेत आहे आणि सत्ता कोणाची असेल हे ठरविण्याचा अधिकार आपल्याकडे आहे.
संदीप गोहोकार