आनंद वाटणारे श्रीमंत बहुरूपी
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दारात पोलिसवाला अचानक उभा होतो. बाहेरूनच आवाज देतो? ‘‘आहे का मालक घरात?’’. घराची मालकीन बाहेर येते. दारात पोलिसवाला उभा पाहून घाबरते. तिथून संवाद सुरू होतो. पोलिसवाला सांगायला लागतो. मालकानं बँकेचं कर्ज घेतलं आहे. दुसऱ्या गावात कोण्यातरी बाईवर मालक खर्च करीत आहे. अशा संवादाने सुरुवात होता होता, मालकिनीच्या चेहऱ्यावरील भाव बदलायला लागतात. मग तिच्या लक्षात येते. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू येतं. ती कौतुकानं त्या पोलिसवाल्याचं म्हणणं ऐकत राहते. दारातल्या ‘‘बहुरूप्याला’’ तिने ओळखलेलं असतं. ती आत जाते. धान्य घेऊन येते. त्याच्या झोळीत धान्य टाकते. जमल्यास काही रूपये देते. बहुरूपी दुवा देत पुढील घराकडे निघून जातो.
अनेक वर्षांपासून बहुरूपी हे लोककलावंत सर्वांच्याच दैनंदिन जगण्याचे घटक आहेत. ग्रामीण भागात हे आजही दिसतात कधी कधी. पण ही लोककला, लोकसंस्कृती लोप होण्याच्या मार्गावर आहे. लोकाश्रयात पूर्वी कला व कलावंत जिवंत राहायचे. आता काळ बदलला. पोटापाण्यासाठी मजुरी, शेती, नोकरी आणि विविध पर्याय यांना निवडावे लागले. आपल्या बापजाद्यांपासून जोपासलेली कला हे निष्ठेने सांभाळण्याचा प्रयत्न करतात.
काल-परवा वणी शहरात बसस्टॅण्ड परिसरात एक असाच बहुरूपी भेटला. वाघाच्या सोंगाचा मुखवटा, चामड्याचं त्याचं वाद्य बगलेत घेऊन हा बहुरूपी टपरीवर चहा पीत होता. तालुक्यातलं नरसाळा हे त्याचं गाव. नाव नरेंद्र शिंदे. ही भटकी जमात. शिक्षण, रोजगार अशा अनेक सुविधांपासून कोसो दूर. काम मिळालं नाही, तर पर्याय म्हणून हे बहुरूपी सकाळीच एखादं नवं सोंग घेऊन निघताते. दिवसभर उन्हातान्हात भटकून, नाचून आणि गाऊन जेमतेम 200 ते 300 रूपये त्यांना मिळतात. पूर्वी लोक धान्य वगैरे द्यायचे. आता दहा-वीस रूपये देतात. पोलिसवाला, नंदिबैल, वाघोबा, विविध देव-देवतांच्या रूपात बहुरूपी लोकांना आकर्शित करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा अनेक लोककलावंतांनी स्वराज्यासाठी गुप्तहेर म्हणून काम केल्याचेही उल्लेख आढळतात.
यांचा जगण्याचा संघर्ष सुरूच आहे. लेकरांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांची धडपड असते. काही ठिकाणी तर अशी जागृतीदेखील नसते. अनेक सत्तांतरे झालीत तरी त्यांचा अजूनही राजाश्रय मिळाला नाही. आर्थिक मदत, रोजगार व शिक्षणासाठी तरतूद रोज दोन वेळेची जेवणाची सोय व्हावी अशा मोजक्याच त्यांच्या अपेक्षा असतात.
अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, स्वच्छता अशा अनेक विशयांवर हे बहुरूपी आपल्या लोककलेतून जनजागृती करीत असतात. अनेकजण आपलं जगणं समृद्ध व्हावं म्हणून वेगवेगळे मुखवटे लावूनच जगत असतात. आपला खरा चेहरा समोर येऊ देत नाहीत. मात्र या बहुरूपींचा मुखवटाच हा त्यांचा चेहरा असतो. दिवसभरात काही मिळालं तर रात्रीची चूल पेटणार असते. खिशात दमडीदेखील नसतील तरी जगण्याचा आनंद ते घेतात. ज्यांच्या ज्यांच्या दारात ते उभे राहतात, त्यांना ते आनंदच देत असतात. कुणाच्या दारातून पसाभर धान्य, दहा-वीस रूपये ते घेतात. या बदल्यात काय देतात? देणाऱ्याला ही बहुरूपी मंडळी आनंदी जगण्याचं रहस्य देत असतात. भरभरून आशीर्वाद, मंगलकामना आणि सदिच्छांची देणाऱ्यांवर बरसात करतात. मग देणाऱ्यालाही प्रश्न पडतो, की आपण संपन्न आहोत की हा भरभरून आनंद देणारा श्रीमंत बहुरूपी.
सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606