रस्ते अपघातग्रस्तांचा उपचारखर्च देणार राज्य सरकार

राज्यात बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लागू

0

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात रस्ते अपघातांत दररोज शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. अनेक अपघातग्रस्तांना किरकोळ इजा असूनही वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागतो. अपघातनंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचविणे शक्य होईल.

ही बाब ध्यानात घेऊन राज्य शासनाने ‘ बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना’ सुरु केली आहे. अपघात घडल्यानंतर ‘गोल्डन अवर’ मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देणारी ही योजना अपघातग्रस्तांसाठी जीवनदायिनी ठरणार आहे.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्यविभागाच्या दि.14 ऑक्टो. 2020च्या शासननिर्णयानुसार ही योजना राज्यात राबविण्यात मंजुरी देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेतील कोणत्याही रस्त्यावर अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचारांची तत्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.

कारखान्यात काम करताना, दैनंदिन कामातील व घरगुती दुर्घटना घडल्यास किंवा रेलवे अपघातात जखमी होणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तींनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजने अंतर्गत सुमारे 74 उपचारपद्धतींतून प्रति रुग्ण किमान रूपये 30 हजार शासन अंगिकृत विमा कंपनीकडून संबंधित दवाखान्याला अदा करण्यात येईल. त्याव्यतिरिक्त अपघात झाल्यानंतर 108 क्रमांकची रुग्णवाहिका जर जवळपास नसेल तर खाजगी रुग्णवाहिकेसाठी अतिरिक्त एक हजार रूपये या योजनेतून मंजूर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे रस्ते अपघातात जखमी व्यक्ती भारतातील कोणत्याही राज्याचा रहिवासी असेल आणि महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमेमध्ये अपघात घडला तर तो अपघातग्रस्त रुग्ण या योजनेचा लाभ घेण्यास पात्र होईल.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.