धानोरकरांना डावलण्यावरून कांग्रेसमध्ये प्रचंड असंतोष

अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत

0

अशोक अकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: मागील सहा महिन्यांपासून कांग्रेस प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेत असणारे शिवसेनेचे भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेश (बाळू) धानोरकर यांना कांग्रेस पक्षाची चंद्रपूर- आर्णी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष घुमसत आहे. यापैकी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आज शनिवारी सकाळी मारेगाव काँग्रेस कार्यालयाला काही नाराज कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकून व पक्षाचे फलक तोडमोड करून आपली नाराजही व्यक्त केली. 

युतीचे सरकार असूनही आपल्या मतदार संघात विकासकामे करता येत नाही अशी जाहीर खंत मागील दोन वर्षांपासून धानोरकर खाजगी व शिवसेना पक्षाच्या बैठकीतही बोलून दाखवीत होते. त्याचबरोबर आपण लोकसभा लढविण्याची मानसिक तयारी केली आहे असे जाहीरपणे बोलून दाखवित होते. त्यामूळे धानोरकर शिवसेना सोडून काँग्रेस पक्षाचा ध्वज हाती घेऊन चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले होते.

त्या दृष्टीने त्यांनी तशी व्यूहरचनाही केली होती. यवतमाळ, चंद्रपूर, मुंबई व दिल्ली येथे त्यांच्या याबाबतीत काँग्रेस श्रेष्ठीसोबत बैठकाही झाल्या होत्या. त्यांना काँग्रेसची उमेदवारी घोषित होणार म्हणून या मतदार संघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली होती. परंतु ऐनवेळी काँग्रेसने विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहीर करून कांग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड केला.

धानोरकरांनी अधिक ताणलेली राजकीय सौदेबाजी, भाजपाने अहिर यांची घोषित केलेली उमेदवारी यामुळे काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा उमेदवारीची घोषणा तातडीने केल्याचे समजते. काँग्रेस पक्षाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने वर्धा लोकसभा मतदार संघात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजातील रामदास तडस यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्षानेही चंद्रपूर मतदार संघात तेली समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचे ठरविले.

काँग्रेसचे अनेक नाराज कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांशी थेट संपर्क साधत आहे. अशोक चव्हाणांनी धानोरकरांना डावलल्याचे संपूर्ण खापर मात्र मुकुल वासनिक यांच्यावर फोडले आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते याबाबत मात्र चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया आणि वणीचे माजी आमदार वामनराव कासावर यांना जबाबदार धरीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.