उमेदवार कोण ? जिंकणार कोण ? चर्चांना उधाण

काँग्रेसच्या उमेदवारीवरून "खुशी कम, ज्यादा गम"

0

विलास ताजने, वणी: चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपा तर्फे विद्यमान खासदार हंसराज अहिर, काँग्रेस तर्फे विनायक बांगडे तर वंचित बहुजन विकास आघाडी कडून ऍड. राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र काँग्रेसची उमेदवारी पहिल्यांदा नागपूरच्या विशाल मुत्तेमवार यांना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बदल करून चंद्रपूरचे विनायक बांगडे यांचे नाव समोर आले.

भाजपा-शिवसेनेत युती झाल्यामुळे लोकसभा निवडणुक लढविण्यास तयारीत असलेले वरोरा – भद्रावतीचे सेनेचे आमदार बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांचा हिरमोड झाला. नेमका धानोरकर यांच्या नाराजीचा फायदा घेऊन त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस नेते कामाला लागले. उमेदवारीसाठी काँग्रेसच्या अटी नुसार  धानोरकर यांनी आमदारकीचा आणि शिवसेनेतील सर्व पदाचा राजीनामा दिला. आणि इथेच खरा घात झाला नव्हे तर घात केला.

जे काँग्रेसचे नेते धानोरकरांच्या उमेदवारीसाठी दिल्ली दरबारी येरझारा मारत होते. तेच आपला विश्वासघात करतील याची पुसटशीही कल्पना धानोरकरसह त्यांच्या समर्थकांना नव्हती. काँग्रेसच्या या फसव्या खेळीमुळं केवळ धानोरकर यांचच नुकसान झालं नव्हे तर त्याहीपेक्षा काँग्रेसचं नुकसान झाल आहे. अशी जनमानसात भावना वजा चीड व्यक्त होत आहे.

धानोरकर यांना शिवसेनेच्या एका गटाच मिळणार अप्रत्यक्ष समर्थन, काँग्रेसचे परंपरागत मतदार,  या मतदारसंघात कुणबी बहुसंख्य असलेला मतदार वर्ग आणि लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी चंद्रपूर, वणी, आर्णी  या भागात कामाच्या माध्यमातून केलेली पूर्वतयारी यासर्व बाबी धानोरकर यांच्यासाठी जमेच्या होत्या. धानोरकर यांची फसगत झाल्याचे समजताच धानोरकर यांच्या उमेदवारीच समर्थन करणाऱ्या वणी, मारेगाव, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत असल्याची चर्चा आहे.

या प्रकरणावरून पक्षातीलच स्वार्थाचं घाणेेेरडं राजकारण करणारी मंंडळीच पक्षाच्या पतनासाठी जबाबदार आहे हे स्पष्ट होते. तुर्तास धानोरकर यांना विविध स्तरावरून पाठींबा मिळत आहे. मात्र ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.