धानोरकरांच्या सत्कारात मनसेचाच माहौल

रॅलीत कासावारांच्या हाती मनसेचा ध्वज

0

श्रीवल्लभ सरमोकदम, विशेष प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विजय संपादन केलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा रविवारी वणीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर अन् त्यांचा पक्ष मनसे ख-या अर्थाने भाव खाऊन गेल्याची प्रचिती आली. जिल्हाभरातील काँग्रेसच्या दिग्गजांसमोर प्रकार घडल्याने पुढील राजकारणाच्या दृष्टीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

26 मे रोजी संध्याकाळी नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या विजयी नागरी सत्काराचे आयोजन वणी विधानसभा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. सत्कारापूर्वी शरहातून विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुतेकांच्या हाती मनसेचा ध्वज होता. नेमकी हिच बाब प्रत्येक वणीकर टिपत होता. मनसेच्या असंख्य ध्वजांमध्ये काँग्रेस पक्षाची एखादी तरी पताका दृष्टीस पडते का? याचा शोध अनेक जण घेत होते. त्यामुळे ही रॅली मनसेची की काँग्रेसची असा प्रश्न अनेकजण आपसात करीत होते. एवढच काय तर ज्या वाहनात धानोरकर आणि काँग्रेसची इतर मंडळी स्वार होती त्यांच्या हातातही मनसेच्या पताका असल्याचे अनेकांच्या दृष्टीस पडले.

टिळक चौकात या रॅलीचे रुपांतर सत्कार समारंभात झाले. यावेळी मंचावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकाराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, वामनराव कासावार यांच्यासह संजय देरकर व मनसेचे राजू उंबरकरही उपस्थित होते. सुरुवातीला वरील सर्वच नेत्यांची भाषणे झाली. मात्र त्यात भाव खाऊन गेले ते केवळ राजू उंबरकरांचे भाषण. ते माईक समोर येताच घोषणा सुरू झाल्या. भाषणादरम्यान त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या अन् घोषणाबाजी होत होती. एवढेच नाही तर खुद्द धानोरकरांनीही आपल्या भाषणातून उंबरकरांशी संवाद साधत त्यांना भरभरून दाद दिली. त्यामुळे मंचावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या नसेल तर नवलच.

कासावारांच्या हाती मनसेचा ध्वज
रविवारी वणीत झालेली काँग्रेसची रॅली एवढी मनसेमय झाली होती की काँग्रेसच्या पुढा-यांनाही मनसेची पताका हातात घेण्यावाचून पर्याय नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे यात दूरदूर पर्यंत काँग्रेसचे ध्वज व पताका दिसत नव्हत्या. ज्या वाहनात धानोरकर व सर्व पुढारी स्वार होते तेथेही वेगळी स्थिती नव्हती. त्यामुळे रॅली सुरू झाल्यानंतर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या हातातही मनसेचा ध्वज बराच वेळ दिसून आला.

कासावारांच्या हाती मनसेचा ध्वज
Leave A Reply

Your email address will not be published.