बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मभूषण डॉ. रामराव महाराज यांचे निधन
रविवारी अंत्यदर्शन आणि सोमवारी होतील अंत्यसंस्कार
संत सेवालाल महाराजांच्या कार्यांची डॉ. रामराव महाराज यांना प्रेरणा होती. संत सेवालाल महाराजांचे विचार ते जनसामान्यात प्रभावीपणे पोहचवीत. सामान्यजनांशी संवाद साधून त्यांना योग्य दिशा दाखवीत. बंजारा समाजाच्या विकासासाठी त्यांनी यावर्षीच मार्च महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बंजारासमाजाच्या उन्नतीसाठी चर्चा केली.
वाशिम जिल्ह्यातील पोहरदेवी येथे त्यांची समाधी उभारण्यात येईल. पोहरादेवी हे स्थान बंजारा समाजासाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानलं जातं. तेथेच रविवारी डॉ. रामराव महाराज यांच्या अनुयायांना त्यांचं अंतिम दर्शन घेता येईल. सोमवारी त्यांच्यावर अंतिमसंस्कार होतील. त्यांच्या जाण्याने देशातल्या विविध क्षेत्रांतील घटकांना धक्का बसला. अनेकांनी शोकसंवेदनादेखील व्यक्त केल्यात.
डॉ. रामराव महाराजांचे प्रेरणास्थान संत सेवालाल महाराज
बंजारा समाजातील क्रांतीकारी युगपुरुष सेवालाल महाराज. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात 15 फेब्रुवारी 1739 रोजी त्यांचा जन्म झाला. बंजारा समाजातील एक महान क्रांतिस्थान व श्रद्धास्थान म्हणून त्यांचा गौरव केला जातो. शिक्षणापासून दूर असलेल्या समाजात त्यांनी केलेली क्रांती ही काळाच्याही पुढे होती. वडील भीमा नाईक आणि आई धरमणी यांना सेवालाल (सेवाभाया), बद्दू, हप्पा, भाणा ही मुलं होती. त्यातील सेवालाल हे ज्येष्ठ.
बैलांच्या पाठीवरून धान्याची वाहतूक करणे हा त्यांचा व्यवसाय. बंजारा समाजाला या व्यवसायामुळे भटकंती करावी लागायची. त्या दरम्यान त्यांना अनेक अन्याय आणि अत्याचारांचा सामना करावा लागायचा. या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात संत सेवालाल महाराजांनी लढा दिला. त्यांनी सातत्याने जगजागृती केली. समाज निरक्षर असल्यामुळे अगदी अलीकडेपर्यंत हे सर्व साहित्य मौखिक स्वरूपातच होतं. संत सेवालाल महाराज हे स्वतः शिक्षणाचा पुरस्कार करीत. समाजाला शिक्षण घेण्याचा आग्रह धरीत. पण तत्कालीन परिस्थितीत ही अत्यंत कठीण बाब होती. पुढे चालून या समाजात शिक्षण आलं. नंतर त्यांचं मौखिक साहित्य हे लिखित स्वरूपात आलं.
संत सेवालाल महाराज आपल्या समाजाची अवस्था पाहत होते. अनेक अंधश्रद्धा आणि व्यसनांमुळे समाजाची अधिकच अधोगती होत होती. त्यांनी समाजाला व्यसनमुक्त होण्याचा उपदेश दिला. स्त्रियांना त्यांच्या सामर्थ्याच जाणीव करून दिली. समाजप्रबोधनाचं कार्य त्यांनी लोककलांच्या माध्यमातून केलं. ते भजन, लडींच्या माध्यमातून लोकाना सहज कळतील असे संदेश देत राहिले.
देवतांना बळी दिल्यास ते प्रसन्न होतात, ही खुळी अंधश्रद्धा संत सेवालाल महाराजांनी मोडून काढली. यामुळे समाजाचे आर्थिक नुकसान व्हायचे. लोक कर्जबाजारीदेखील होत. त्यातून प्राणीहिंसा व्हायची ती वेगळीच. आपण जगत असताना काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे हे ते समाजाला सातत्याने पटवून देत. रोजच्या जगण्यात आपण किती अंधश्रद्धा बाळगतो हे त्यांनी समाजाच्या लक्षात आणून दिलं.
या समूहांना वर्षभर रोजगार मिळेलच याची शाश्वती नसायची. त्यामुळे अनेकदा उपासमार व्हायची. यातूनच काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे मजबुरीनं वळायचे. मात्र संत सेवालाल महाराज त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या प्रामाणिकतेचे दाखले द्यायचे. आपण कोणत्याही परिस्थितींमध्ये गुन्हेगारीकडे वळायचे नाही, असा ते वारंवार आग्रही संदेश द्यायचे. शिक्षणाच्या अभावाने हे सगळं घडत होतं. सर्वांनी शिक्षण घ्यावंच असं ते म्हणायचे.
समाजात तेव्हा जातपंचायत असायची. न्याय-निवाडे समाजातील नाईक करायचे. मात्र अनेकदा यातही भेदभाव व्हायचा. निरपराधांवर अन्याय व्हायचा. या विरूद्ध संत सेवालाल महाराजांनी आवाज उठवला. माणसाने माणसाचं शोषण करू नये असं ते सातत्याने सांगायचे. मानवते महत्त्व ते निरंतर पटवून द्यायचे. भिन्न मतांच्या, भिन्न गटांच्या समुदायांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आंधप्रदेशातून ते महाराष्ट्रात आले. इथेही त्यांनी झंझावातासारखे आपले कार्य सुरूच ठेवले. दिल्लीतही त्यांनी एक मोठी परिषद भरवली होती.
पारंपरिक व्यवसायासोबत आपण इतर नवीन व्यवसाय करावेत. दारूसारखे व्यसन, जुगार, चोरी, गुन्हेगारी, अंधश्रद्धा आणि अज्ञानापासून दूर राहावे. मानवतेच्या कल्याणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवावा. आपण अत्यंत सात्विकतेनं आपलं आयुष्य जगावं. पैसा कमवताना लबाडी करू नये. अनावश्यक हिंसा टाळावी. सदैव सेवाभाव बाळगावा, असं संत सेवालाल महाराज सांगत. कोणीही कोणावर अन्याय करू नये आणि कुणाचा अन्याय सहनही करू नये हा त्यांचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतसारा वसूल करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी लढा दिल्याचाही उल्लेख आढळतो.
या महामानवाने 2 जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रुईगड येथे आपला देह ठेवला. त्यांची समाधी वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आहे. येथे दिवाळी, रामनवमी आणि संत सेवालाल महाराज जयंतीला यात्रा भरते. संत सेवालाल महाराज यांनी लोकहितासाठी स्वतःला वाहून घेतलं. त्यांनी लग्नदेखील केलं नाही. त्यांच्या जन्माच्या, कार्याच्या आणि निर्वाणाच्या अनेक चमत्कारिक आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र त्या काळात मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समुदायासाठी त्यांनी केलेलं कार्य हाच एक मोठा चमत्कार आहे.