पीक कर्ज वाटप करताना बँकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये

मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे बँक प्रशासनाला निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी : खरीपचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे व खताची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा, अशी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. मात्र पीक कर्ज वाटपात बँक प्रशासन अडथळा निर्माण करून वेळेवर पीककर्ज वाटप करणार नसतील तर मनसेला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. असे निवेदन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बँक प्रशासनाला दिले.

शेतकर्‍यांची खरीप हंगामापूर्व कामे पूर्ण झालेली आहे. यंदा मानसून वेळेत दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला आहे. मात्र अनेक बँकांकडू शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नाहक त्रास दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही हजार रुपयांच्या कर्जासाठी लाखमोलाची शेतजमिनीवर बोजा चढविण्यात येतो.

बँकांना ठरलेल्या मुदतीत पीक कर्जाचे वाटप करणे गरजेचे आहे. कर्जासाठी बँका समोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा याकरिता बँकांनी पुढाकार घ्यावा. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला सावकाराचा उंबरठा ओलांडण्याची वेळ येवू नये ही खबरदारी सुद्धा बँकांना घ्यावी लागणार आहे. बँकांनी आठ दिवसांत कोणताही अडथळा न आणता शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे. जमिनीच्या किमती ग्राह्य धरून त्याप्रमाणे कर्ज वाटप करावे.

पीक कर्जाअभावी तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याने जीवाचे काही बरेवाईट केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल. असा निवेदन व इशारा मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणीतील सर्व बँक प्रशासनाला दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी
कोणतीही बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास विलंब करत असेल तसेच शेती संबंधित कुठल्याही कामाबद्दल त्रास देत असेल तर शेतकऱ्यांनी मनसेच्या वणी किंवा चारगाव चौकी येथील कार्यालयात त्वरीत संपर्क साधावा.
राजू उंबरकर- राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Comments are closed.