वणीतील ‘या’ बारच्या मालकाला अवैध दारू विक्री प्रकरणी अटक
एकाचा शोध घेतला असता बाहेर निघाले संपूर्ण घबाड
विवेक तोटेवार, वणी: पोलिसांना शहरात एक व्यक्ती अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांना रंगेहाथ पकडताना तो पळून गेला. मात्र त्याला दारू कुठून मिळाली याचा तपास केला असता. दारू विक्रीतील अख्खी एक साखळी समोर आली. पोलिसांनी या प्रकरणात बारमालकासह पाच जणांना अटक केली. पोलिसांनी बारचा परवाना रद्द करण्याकरिता जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे अहवाल पाठविला आहे.
सविस्तर वृत्त असे की, 24 एप्रिल शुक्रवारी ईश्वर राकेश गड्डीवार हा इसम वणीच्या ग्रामीण रुग्णालयाजवळ अवैधरीत्या दारूविक्री करीत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले. परंतु पोलीस येण्याची चाहूल लागताच आरोपीने घटनास्थळावरून दारूचा माल तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी त्याच्यावर 65 (इ), सहकलम 188 भादंवी नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. आरोपीला कुठून दारू मिळाला याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली असता ईश्वर गड्डीवार याच्यासह हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे रा. दामले फैल यांना नांदेपेरा रोडवर स्थीत न्यू सितारा या बारमधून बार चालक व्यवस्थापक राजू नारायण दुमट्टीवार (45) रा. पुनवट विदेशी दारूच्या दोन पेट्या माल दिला. गड्डीवारवर आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता तपासात रायपुरे व त्यांना दारू देणारा बार चालक राजू याचेही नाव आल्याने या प्रकरणात गड्डीवारसह या दोघांनाही आरोपी करण्यात आले.
26 एप्रिल रविवारी ईश्वर राकेश गड्डीवार (23) रा. भीमनगर याला अटक करण्यात आली. त्याला दिलेल्या मालपैकी काही माल ग्रामीण रुग्णालयासमोर सापडला होता. आता उर्वरीत माल कुठे आहे याबाबत चौकशी केली असता त्याने आणखी दोघांची नावे सांगितली. त्याने उर्वरित माल शेख बाबा शेख रफिक रा. रामपूरा वार्ड व कृष्णा एकनाथ साहू याला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकून याच्याकडून 6,300 रुपये नगदी व उर्वरित माल जप्त केली.
न्यू सितारा बारमालकाला अटक
या बारचा परवाना नंदकिशोर बशकराम फेरवानी यांच्या नावे असल्याने त्यांना ही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला आहे. वणीत अजून एका बारचा परवाना रद्द होतो की काय? याकडे लक्ष लागले आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, दीपक वानड्रसवार, सुदर्शन वनोळे, अमित पोयाम यांनी केली.