विवेक तोटेवार, वणी: आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक यांना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास चार जणांनी रोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर आपल्या म्हणण्यानुसार तक्रार होत नसल्याने पाहून त्यांनी आता अमरावती पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली आहे.
प्रेमकुमार ढुरके (अंदाजे 30) हे रंगनाथ नगर वणी येथील रहिवासी आहे. ते आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक आहे. बुधवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या काही मित्रांसह दीपक चौपाटी परिसरात चहा पिण्यासाठी गेले होते. चहा घेतल्यानंतर त्यांचे मित्र कॅन्टीनवरून निघून गेले. दरम्यान त्यांना एकटे पाहून चार लोकांनी त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला व पायाला ईजा झाली.
त्यांना वणीतील ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात एक्स रे काढण्यासाठी नेण्यात आले. तिथे त्यांना तीन ठिकाणी फ्रॅक्चर निघाले. उपचार करून प्रेमकुमार व त्यांचे सहकारी वणी पोलीस ठाण्यात आले. मात्र रिपोर्ट लिहिताना त्यांच्यात आरोपीचे नाव लिहिण्यावरून वाद झाला. त्यामुळे ते तिथून तक्रार दाखल न करताच घरी परतले. आज 10 ऑगस्ट रोजी प्रेमकुमार व त्यांचे सहकारी हे पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्याची माहिती आहे.
कोणत्याही आरोपीला सोडणार नाही – ठाणेदार अजीत जाधव
पोलीस ठाण्यात प्रेमकुमार तक्रार देण्यासाठी आले होते. आरोपीची ओखळ पटवून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान त्यांना काही लोकांचे फोन येत होते. त्यांच्या सांगण्यावरून ते तक्रार न देताच ठाण्यातून निघून गेले. मात्र पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी त्यांची समजूत काढण्यासाठी गेले होते. मात्र ते अमरावतीला जाऊन तक्रार करण्यावर ठाम होते. आरोपी कुणीही असला तरी त्याला सोडणार नाही. कायदा सर्वांसाठी सारखा आहे.
– अजीत जाधव, ठाणेदार वणी पोलीस स्टेशन
एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांच्या सांगण्यावरून ही मारहाण करण्यात आल्याचा तक्रारकर्त्याचा आरोप आहे. यावरूनच पोलीस ठाण्यात तक्रारदाराचा वाद झाल्याची माहिती आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.