घंटी वाजली नाही नि चोरी झाली

शाळांसह मंदिरंही चोरट्यांच्या निशाणावर

0

तालुका प्रतिनिधी, वणी: परिसरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ आहे. लॉकडाऊनमुळे आता मंदिराची घंटी वाजत नाही. शाळांचीही घंटी वाजत नाही. त्यामुळे चोरींचे प्रमाण वाढत आहे. चोरट्यांनी देवतांनाही सोडलं नाही. देवतांच्या मंदिरांसह ज्ञानाच्याही मंदिरांना याचा फटका बसत आहे. नुकतीच वणीतील जैताई मंदिर आणि मारेगाव (कोरंबी) येथील शाळेत चोरी झाली. शाळा असो, की मंदिर चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. काळजी आणि सतर्कतेची गरज निर्माण झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि मंदिरं अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलीत. अशा बंद असलेली ठिकाणं चोरट्यांचं टार्गेट होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन, प्रशासनाने गर्दीची ठिकाणं बंद ठेवलीत. अशा कुलूपबंद असलेल्या ठिकाणी चोरटे चोरी करून हात साफ करीत आहेत.

नुकतेच वणी तालुक्यातील मारेगाव ( कोरंबी ) येथील जनता विद्यालयाचे दार तोडून कॉम्प्युटर आणि अन्य साहित्य लंपास केलीत. तर दुसऱ्या घटनेत वणीच्या जैताई मंदिरातील दोन सिलिंग फॅन काढून नेलेत. घटनेची तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. मात्र अद्याप चोरट्यांचा सुगावा लागला नाही.

परिसरातील वाढत्या चोरीच्या घटना ही चिंतेची बाब ठरत आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा चोरटे घेत आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लॉकडाऊनपूर्वी प्रार्थनास्थळांवर लोकांची नियमित ये-जा असायची. आता मात्र शाळा असोत की प्रार्थनास्थळं ओस पडत चाललीत. तिथल्या वस्तूंवर डल्ला मारण्याचा चोरट्यांचा बेत दिसत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.