निकेश जिलठे, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीनंतर आता संचारबंदीही लागू झाली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांनाच सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाजीविक्रीचाही समावेश आहे. मात्र उद्या बुधवारी दिनांक 25 मार्चपासून भाजीमंडई अनिश्चितकाळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय ठोक आणि चिल्लर भाजी विक्रेत्यांनी घेतलाये. उद्यापासून हा निर्णय लागू होणार असून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ रविवारी भाजी मंडई सुरू राहणार आहे.
वणीतील भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात बाहेगावाहून भाजीपाला येतो. शेतकरीही मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून माल घेऊन येतात. त्यामुळे इथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. जमावबंदी असली तरी लोक भाजीपाला खरेदी करण्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात घेऊन आज वणीतील मंडईत ठोक आणि चिल्लर भाजी विक्रेंत्यांची बैठक झाली. या बैठकीत एकमताने भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी भाजी मंडई सुरू
बुधवार पासून भाजी मंडई बंद राहणार असल्याने आजच आवश्यक तेवढा भाजीपाला खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी मंडई सुरू राहणार आहे. मात्र रविवारीही मोठ्या गर्दी न करता योग्य खबरदारी घेऊन भाजी खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाजी मंडईचा निर्णय़ हा अनिश्चितकाळासाठी असून अद्याप केवळ रविवारी एकच दिवस मंडई सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. पुढील निर्णय हा परिस्थिती बघून घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयासाठी कोणताही प्रशासकीय दबाव नसून भाजी विक्रेत्यांनी कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून स्वयंस्फुर्तीने निर्णय घेतला असल्याची माहिती दिली.