राजूरमध्ये भीमजयंती धुमधडाक्यात साजरी
महेश लिपटे, राजूर: भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती राजूरमध्ये दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजिक करून जल्लोषात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी मिळून साजरी केली. विविध कार्यक्रमामुळे संपूर्ण राजूर गाव आंबडेकरमय झाले होते. तर आज रविवारी संध्याकाळी महिला मंडळाच्या हॉलमधून कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची गावात एक महिन्यापासून जय्यत तयारी सुरू होती. जयंती उत्सवाला पुर्वसंधेपासूनच सुरूवात झाली होती. 13 तारखेला रात्री 12 वाजता केक कापून भीमजयंती साजरी करण्यात आली. 14 तारखेला दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. सकाळी 9 वाजता संपुर्ण गावातुन मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मोटारसायकलीला लावण्यात आलेले निळे आणि पंचशील ध्वज सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीमध्ये तरूण, वयस्कर स्त्री व पुरूष सर्वांनी सहभाग घेतला. यावेळी ठिकठिकाणी प्रमुख चौकात मान्यवरांच्या हस्ते धम्मध्वज फडकविण्यात आला.
सायंकाळी 6 वा. गावात भव्य मिरवणूक काढण्यात आलील. भीमगीते, भीमगर्जना करीत वाजत गाजत रॅलीने गावातील प्रमुख रस्त्याने प्रत्येक चौकातून मार्गक्रमण केले. यावेळी ठिकठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली. मुस्लिम बांधवांतर्फे यावेळी रॅलीचे स्वागत करण्याकरीता अल्पोपहार आणि सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. गावात विविध धर्माच्या लोकांकडूनही अल्पोपहाराचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावर्षी राजूर इजारा आणि राजूर कॉलरीची संयुक्त रॅली काढण्यात आली, हे या रॅलीचं वैशिष्ट्य ठरलं. रॅलीला कुठेही गालबोट न लागता शांततेत ही रॅली पार पडली. रॅलीचा समारोप दीक्षाभूमी बुद्धविहार येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंती उत्सव कमेटीच्या आणि गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले. रविवारी संध्याकाळी कठुआ घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आसिफाला न्याय मिळवून देण्यासाठी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.