थांबत नाही घरफोडीचा कल्ला, तोच चोरट्याचा गाडीवर डल्ला

टागोर चौकात लावलेली बाईक चोरट्याने केली गायब

बहुगुणी डेस्क, वणी: घरफोडीच्या घटना थांबता थांबेना तोच पुन्हा गाडी चोरट्यांनी आपलं डोकं वर काढलं. वर्षभर गाडीचोरीच्या तुरळक घटनाही सुरू आहेत. कार असो वा बाईक या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अगदी सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या परिसरातूनही गाड्या चोरीला जात आहेत. ही वणीकरांसाठी चिंतेचीच बाब झाली आहे. टागोर चौकातील या घटनेनं वणीकरांना पुन्हा काळजीत टाकलं आहे. तिथल्या युनियन बॅंकेजवळून लाठी येथील मंगेश बंडू मोते यांची अंदाजे 40 हजार रूपये किमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल (MH 29 BW 9586) चोरीला गेली.

तक्रारीनुसार मंगेश बंडू मोतेवरी हे नजिकच्या लाठी या गावी राहतात. ते वणीतल्या एका मेडीकल स्टोअर्समध्ये कामाला आहेत. त्यांनी दैनंदिन वापराकरिता सन 2022 मध्ये हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची मोटार सायकल घेतली होती. ती मोटार सायकल ते स्वतःच वापरत होते. मंगळवार दिनांक 06 मे रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांची मोटार सायकल टागोर चौकातील यूनियन बँकच्या बाजुला लावली. तिथून ते आपल्या कामावर मेडीकल स्टोअर्सला गेलेत. सायंकाळी 04.00 च्या सुमारास युनियन बँकच्या बाजुला टागोर चौकात लावलेली गाडी त्यांना दिसली नाही. त्यांनी आजुबाजुच्या परिसरात मोटार सायकलचा शोध घेतला तरीही ती मिळाली नाही.

त्यांनी तक्रार लिहेपर्यंत आजुबाजुला, मित्रांकडे व परीसरात बाईकचा शोध घेतला. परंतु ती कुठेही सापडली नाही. अखेर त्यांची गाडी कोणी तरी चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठलं. गाडी चोरी गेल्याचा रिपोर्ट दिला. त्यानुसार अज्ञात आरोपीविरूद्ध कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. करून तपासात घेतला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Comments are closed.