बहुगुणी डेस्क, वणी: 31 डिसेंबरला झिंगण्याची चढाओढ लागते. मात्र एक तरुण इतका झिंगला की त्याला रात्री दुचाकी कुठे ठेवली हेच आठवत नव्हते. विशेष म्हणजे त्याच्या सोबत असलेल्या मित्राने तरुणाला गावी सोडून दिले. पण त्याला देखील आपण रात्री कुठे होतो, हे आठवत नव्हते. दोन तीन दिवस दुचाकीचा शोध घेतल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याचे समजून तरुणाने याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्याददार तरुण (28) हा मंदर येथील रहिवासी आहे. तो वणीतील एका मंडप डेकोरेशनमध्ये मजुरीचे काम करतो. 31 डिसेंबर असल्याने त्याने व त्याच्या मित्राने संध्याकाळ होण्याच्या आधीपासूनच 31 मनवायचा प्लान केला. लवकर सुट्टी घेऊन तो त्याच्या मित्रासह त्याची दुचाकी होन्डा शाईन या गाडीने 4 वाजता शाम टॉकीज परिसरातील एका वाईन शॉपमध्ये गेला. तिथून त्यांनी दारू विकत घेतली. त्यानंतर दोघांनी चांगलीच ढोसली. दरम्यान त्याचा मित्र दुचाकी चालवण्याइतका शुद्धीवर होता पण फिर्यादी तरुण ‘सुलार’ झाला.
झिंगलेल्या अवस्थेतच तो आपल्या गावी परत निघाला. मात्र त्याला दीपक टॉकीज चौपाटी पर्यंत गाडी नेता आली. शुद्ध हरपल्याने त्याने त्याची दुचाकी रस्त्यात लावली. दुचाकी चालवण्याची स्थिती नसल्याने फिर्यादीच्या मित्राने त्याला त्याच्या दुचाकीने गावी सोडले. दुस-या दिवशी फिर्यादी सकाळी उठल्यावर त्याला दुचाकी कुठे ठेवली हेच आठवत नव्हते. त्यामुळे तो मित्रासह दीपक टॉकीज चौपाटी व घुग्गुस रोडवर दुचाकी शोधण्यास गेला. मात्र शोधाशोध घेतल्यानंतरही त्याला दुचाकी आढळून आली नाही.
दोन तीन दिवस शोध घेतल्यानंतर अखेर त्याने शनिवारी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली व अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
‘येथे’ ठेवली होती दुचाकी
दारू पिल्यानंतर रात्री फिर्यादी त्याच्या मित्रासह घुग्गुस रोडवरील एका धाब्यावर जेवणासाठी गेले. तिथे ते रात्री जेवले. फिर्यादी शुद्धीत नसल्याने त्याच्या मित्राने फिर्यादीला गावी सोडून दिले. मात्र दुस-या दिवशी दुचाकी कुठे ठेवली हे आठवत नसल्याने ते दीपक टॉकीज चौपाटी ते जत्रा रोड या परिसरात दुचाकीचा शोध घेत होते. विशेष म्हणजे मित्राला कुठून दुचाकीवर बसवले हे त्याच्या मित्राला देखील आठवत नव्हते. घुग्गुस रोडवरील एका धाब्याजवळ दोन तीन दिवसांपासून एक दुचाकी बेवारस अवस्थेत होती. कुणीही दुचाकी घेऊन न गेल्याने धाबा चालकाने याची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यात आधीच तक्रार आल्याने पोलिसांनी खात्री करून गाडी ठाण्यात जमा केली व दुचाकीचा शोध लागला.
Comments are closed.