अखेर ‘त्या’ रेती तस्कराचा जामीन न्यायालयाने फेटाळला

'बिल्ला'ची बेलसाठी पळापळ... अटकेकडे वणीकरांचे लक्ष...

0

विवेक तोटेवार, वणी: महसूल अधिकाऱ्यांना धमकी देऊन बळजबरीने अवैध रेती भरलेला ट्रक खाली करणाऱ्या वणीतील रेती तस्कर उमेश पोद्दार याला पांढरकवडा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. याआधी त्याला अंतरिम (तात्पुरता) जामीन मिळाला होता. गणेशपूरचे मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी उमेश पोद्दार रा.वणी यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून वणी पो.स्टे. मध्ये 21 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आधी तो फरार होता त्यानंतर त्याला सत्र न्यायालयाने तात्पुरती जमानत दिली होती. 10 जून बुधवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होती. मात्र सत्र न्यायालयाने या तस्कराची अंतरिम जमानात फेटाळून लावली आहे.

वणीत रेती तस्कर रंगा बिल्ला जोडीतील बिल्ला म्हणून कुख्यात असलेल्या उमेश धुलीचंद पोद्दार याचा 21 मे रोजी छोरिया ले आऊट मध्ये रेतीचा ट्रक मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांनी पकडला. यावेळी पोद्दार यांनी त्यांना कट मारून गाडी काढली व जीवे मारण्याची धमकी दिली. देशपांडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात पोद्दार यांच्याविरोधात कलम 353, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला गेला होता.

यावेळी पोद्दार यांने पळ काढला. दिनांक 27 मे रोजी पांढरकवडा येथील सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने 30 मे रोजी पर्यत तात्पुरती जमानत दिली होती. या प्रकरणाची अंतीम सुनावणी 10 जून रोजी होती. बुधावरी 10 जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पोद्दार यांची अंतिम जमानात अर्ज फेटाळून लावला आहे.

बिल्ला गावात फिरून फरार
वणीत रेती चोरीच्या अनेक घटनांमध्ये रंगा-बिल्ला जोडीची नवे येत असे. परंतु काही कारणास्तव ही जोडी फुटली व दोघेही वेगळे झाले. यांनी एकाच काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केले. पैशाच्या जोरावर त्याची जास्तच मजल गेली. लिलाव झाले नसले तरी रेतीचा साठा करून चढ्या भावाने विक्री करणे. एकाच पासवर अनेक फेऱ्या मारणे यासाठी ते कुप्रसिद्ध आहे.

या कामात त्यांनी काही अधिका-यांनाही सोबत घेतल्याचे बोलले जाते. परंतु रेती तस्कर कितीही कुख्यात असला तरी एक ना एक दिवस माती नक्कीच खातो. त्याची मुजोरी त्याच्याच चांगलीच अंगलट येताना दिसत आहे. त्यामुळे आता त्याला पळवाट शोधावी लागत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बिल्ला गावात फिरून फरार होता. आता त्याच्या मुसक्या आवळण्याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.