भारतातल्या पक्षिसप्ताहाची सुरुवात वैदर्भियांची

शासनस्तरावरचा पहिला पक्षिसप्ताह 5 ते 12 नोव्हेंबरपर्यंत

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी बालपणातल्या चिऊकाऊच्या गोष्टींपासूनच आपल्या आयुष्यात पक्षी येतात. पहाटेच्या किलबिलाटाने जाग येते. दिवसाची सुरुवातही तिथूनच होते. अंगणातला अथवा घरातला पिंजऱ्यातला पोपट असो, की आताचे लव्ह बर्डस् आपल्याला भुरळ घालतात. पक्षी आपल्या जीवनाचाच भाग आहे.

या पक्षांवर संतांनी, कवींनी नितांत प्रेम केलं. ज्ञानदेवांचा ‘पैल तो गे काऊ कोकताहे’ असो, की संत तुकोबारायांचा ‘पक्षीही सुस्वरे आळविती’ असो हा पक्षी संवाद साधतच आहे. या पक्षांवर प्रेम करणारे जगभरात आहेत. त्यांच्याच नावाने सप्ताह साजरा करावा, ही भन्नाट कल्पना आली ती मुळात विदर्भातून.

महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र नावाची संस्था महाराष्ट्रात आहे. त्याचे अध्यक्ष अमरावतीचे जयंत वडतकर आहेत.  बहार नेचर फाउंडेशन ही वर्धा इथली संस्था. त्यांनी हे पाऊल उचललं. तीन वर्षांपासून पक्षिसप्ताह साजरा व्हावा याचा पाठपुरावा सुरूच होता. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांच्याकडे हा विषय मांडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव यांच्यासोबत याच वर्षी 7 जुलैला मिटिंग झाली.

अमरावतीचे यादव तरटे पाटील यांनी पक्षिसप्ताहाचा प्रस्ताव मांडला. 27 ऑक्टोबरला महाराष्ट्र शासनाने राज्यात पक्षिसप्ताह साजरा करण्याचे आदेश दिलेत. 5 नोव्हेंबर हा मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस. 12 नोव्हेंबर ही पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती. त्यामुळे दिनांक 5 ते 12 नोव्हेंबर हा राज्याचा अधिकृत पक्षिसप्ताह या वर्षीपासून सुरू होत आहे.

खरे पाहता या पक्षिसप्ताह सुरू होण्याचे खरे श्रेय विदर्भाचेच, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पक्ष्यांसाठी काम करणारे, झटणारे अनेक पक्षिमित्र आणि संघटना महाराष्ट्रात आहेत. त्यांची कार्य करण्याची पद्धती आणि निरीक्षण हे विलक्षणच आहे.

डॉ. सलीम अली आणि मारुती चितमपल्ली

विखुरलेले पक्षिमित्र, पक्षितज्ज्ञ आलेत एकत्र
पक्षिमित्रांचं संघटन असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय पक्षिसंमेलन घेण्याचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात झाला. तोही जवळपास 39 वर्षांपूर्वी. या संस्थांनी सामान्यजनांना पक्ष्यांकडे वळवले. संपूर्ण राज्यात पक्षिप्रेमी, पक्षितज्ज्ञ आहेत. विविध उपक्रमांतून ते जुळायला लागलेत. नवे वन्यजीव अभ्यास, संशोधक तयार व्हायला लागलेत. पर्यावरणाचं संवर्धन करणारी, निसर्ग, पक्षी यांवर लिहिणारी फळी तयार झाली. आजही पक्ष्यांवरील निरीक्षण, लेखन, संशोधन आदी क्षेत्रात काम करणारे दिवसेंदिवस वाढतच आहेत.

 

यादव तरटे पाटील

अशी झाली पक्षिसप्ताहाची सुरुवात
पक्षिमित्रांचे पहिले विदर्भ संमेलन 2016 ला वर्धा येथे झाले. या संमेलनात पक्षिसप्ताह साजरा करण्याचा ठराव मांडण्यात आला. दुसऱ्याच वर्षी 2017 ला अंबेगोगाईला 30वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन झालं. तिथंही हा ठराव झाला. समन्वयक म्हणून जयंत वडतकर यांनी पक्षिमित्रांना आवाहन केलं. आपापल्या लेव्हलवर अनेकांनी हा सप्तहा साजरा करण्यास सुरूवात केली. पहिल्या वर्षी 2017ला 22 जिल्हयांमध्ये हा साजरा झाला. 2018मध्ये 28 जिल्ह्यांत पक्षिसप्तानिमित्त विविध कार्यक्रम झालेत. वर्ध्याचे दिलीप वरखडे आणि अमरावतीचे जयंत वडतकर यांनी शासनाकडे निवेदन दिलं. वनविभागचे तेव्हाचे सचिव विकास खरगे यांची भेट घेतली. राज्याचे प्रधानमख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना विषय समजावून सांगितला. हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांच्याकडे दिला. अलीकडेच शासनाचा आदेश मिळाला. आता शासनस्तरावर अधिकृतपणे हा पक्षिसप्ताह साजरा होईल. पक्ष्यांच्या समस्यांवर काम होणं आवश्यक आहे. वनविभागाच्या पाठबळामुळे पक्षिमित्रांचा उत्साह वाढला. यंदा शासनस्तरावर साजरा होणारा हा पहिलाच पक्षिसप्ताह असेल.

डॉ. जयंत वडतकर

पक्षिसप्ताह का आणि कसा
दिवसेंदिवस अनेक पक्षी लोप पावत आहेत. शहरातून चिमण्यादेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे पक्षी वाचले पाहिजेत. जगले पाहिजेत. वाढले पाहिजेत. पक्ष्यांच्या अद्भूत आणि अफाट विश्वाचं ज्ञान मिळालं पाहिजे. त्यांच्या असण्या-नसण्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासता आला पाहिजे. अशा अनेक कारणांनी पक्षिसप्ताचं महत्त्व आहे. त्यामुळेच काही मार्गदर्शक सूचना या सप्ताहाच्या अनुषंगाने करण्यात आल्यात. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी 5 नोव्हेंबरला सप्ताहाचे उद्घाटन आणि विविध कार्यक्रम होतील.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.