मार्डी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी, विविध कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. लोढा यांचा आदिवासी समाजाच्या उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार
निकेश जिलठे, वणी: आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा मार्डी येथे सत्कार करण्यात आला. जय पेरसापेन आदिवासी संघटना व जय पेरसापेन बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. शनिवारी संध्याकाळी माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते डॉ. लोढा यांना हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
बिरसा मुंडा जयंती निमित्त मार्डी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी 10 वाजता गावातील प्रमुख रस्त्यावरून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व माजी ग्रामसेवक उत्तमरावजी कुमरे यांनी केले. तर दुपारी एक वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर प्रबोधन मेळावा घेण्यात आला. यात प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके हे होते.
यांच्यासोबतच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गीत घोष, आंतरराष्ट्रीय आदिवासी साहित्य संशोधक मनोज मडावी, नागपूर, संग्राम परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन मेश्राम, प्रा. अविनाश पंधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबोधन मेळाव्यात मारेगाव तालुक्यातील सर्व आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर आदिवासी मित्र पुरस्कार प्राप्त डॉ. महेंद्र लोढा यांचा आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत वसंतराव पुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वसंतराव पुरके म्हणाले की स्वतःच्या समाजातील समस्या, दुःख सर्वांनाच दिसते मात्र इतर समाजातील समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी कृती क्वचितच दिसून येते. आदिवासी समाजातील समस्या समजून घेऊन ते सोडवण्यासाठी डॉ. लोढा झटत आहे ही आदिवासी बांधवांसाठीच नाही तर इतरांसाठी ही प्रेरणादायी असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
मी वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने नेहमीच आदिवासी भागात जातो. तिथे गेल्यावर आदिवासी बांधवांना केवळ वैद्यकीय सेवाच नाही तर शिक्षण, रोजगार इत्यादी गोष्टींचीही नितांत गरज आहे. देशाला वायफाय, डिजिटल टेक्नॉलॉजीने समृद्ध करण्याचा खटाटोप सुरू आहे. अनेक मोठमोठाले विकासाचे दावे होत असताना अजूनही आदिवासी पोड हे विकासाच्या कोसो दूर आहेत. त्यांच्या पर्यंत विकासाची गंगा अद्यापही पोहचली नाही. जर देशाचा संपूर्ण विकास करायचा असेल तर आदिवासी समुदायाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेकडो आदिवासी गाव दत्तक घेऊन आदिवासी बांधवांसाठी जे माझ्या परिने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो व भविष्यात ही त्यांच्यासाठी शक्य तेवढे कार्य करण्याचा प्रयत्न करणार.
कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली पारंपरिक आदिवासी कला साजरी करून उपस्थितांचे मन जिंकले. सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वदंता येरमे यांनी केले तर प्रास्ताविक बिरसा मुंडा जयंतीचे आयोजक अनिल कुमरे यांनी केले, आभार सीमा कुमरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन तोडासे, निरज कनाके,चंद्रशेखर मडावी, बाबाराव टेकाम, बाळा आत्राम, भोला मडावी, रुपेश जुमनाके, मोतिराम उईके, माणिक कांबळे इत्यादीनी परिश्रम घेतले.
यावेळी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींसह राकाँचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे, सूर्यकांत खाडे, अंकुश मापूर, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्दीकी, भारत मत्ते, मारोती मोहाडे, राऊत, नितीन गोडे, राजू उपरकर, अशोक उपरे, रवि येमुर्ले, इत्यादींसह वणी आणि मारेगाव येथील कार्यकर्ते सहभागी होते.