भरधाव बोलेरोची अज्ञात वाहनाला भीषण धडक, गाडी चकनाचूर

साईलीला नगरी जवळील घटना, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू तर सहकारी गंभीर

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मुकुटबन रोडवर शहरापासून जवळच असलेल्या साईलीला नगरी जवळ एका बोलेरो गाडीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला आहे. मृतकाचे नाव संकेत गंगाधर सोनपितरे (30) रा. पुरड ता. वणी असून प्रफुल्ल देवदास मोहितकर (23) रा. नेरड ता. वणी हा गंभीर जखमी आहे.

रविवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी बोलेरो (MH34 BF8741) या गाडीने चालक संकेत गंगाधर सोनपितरे (30) रा. पुरड व त्याचा सहकारी प्रफुल्ल देवदास मोहितकर (23) रा. नेरड हे वणीहून मुकुटबनच्या दिशेने जात होते. दरम्यान रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वणीपासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या साईलीला नगरीच्या नजिक घोन्सा फाट्याजवळ भरधाव जाणा-या बोलेरो गाडीला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या बाजुला बसलेला त्याचा सहकारी हा गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती रस्त्यावरून जाणा-या प्रवाशांना मिळताच त्यांनी याची माहिती वणी पोलिसांना दिली. पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य करीत दोघांनाही वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी चालक संकेत गंगाधर सोनपितरे याला मृत घोषीत केले. त्याचा सहकारी प्रफुल्ल देवदास मोहितकर (23) याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले.

अपघात झाला तेव्हा चालक आणि त्याचा सहकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गाडीला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली की पाठिमागून हे कळू शकले नाही. सदर गाडी ही मुकुटबन जवळील एका खासगी कंपनीत लावलेली असल्याची माहिती आहे. सदर घटनेचा पंचनामा वणी पोलीस करीत असून धडक देणा-या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

हे देखील वाचा:

भाजप नगरसेवकाच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात भाजपला मोठे भगदाड

मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित

Leave A Reply

Your email address will not be published.