विकासाच्या घोषणांनी सभा गाजली: पट्टे व अनुदान यांची

भाजपचा दमदार रोड शो, चंद्रशेखर बावनकुळे यांचा वणीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शनिवारचा दिवस भाजपने गाजवला. हजारोंच्या जनसमुदायाने सहभाग घेतलेला भव्य रोड शो व त्यानंतर झालेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रचार सभा विकासाच्या घोषणांनी गाजली. वणीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी मतदारांपुढे मांडला. तसेच शासकीय जागेवर राहणाऱ्या रहिवाश्यांना पट्टे प्रदान करण्याची घोषणा करत त्यांनी सुखद धक्का दिला.   

दु. 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रोड शोला सुरुवात झाली. खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, जत्रा रोड, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करत रॅली  निघाली. ढोलताशांच्या गजरात, घोषणांच्या दुमदुमाटात निघालेल्या या रॅलीने शहराच्या प्रत्येक गल्लीत उत्साहाची लहर उसळवली, या रॅलीचे मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी नेतृत्व केले. घोषणांच्या निनादाने शहर दुमदुमून गेले. मार्गक्रमणादरम्यान प्रत्येक चौकात मतदारांनी उमेदवारांचे स्वागत केले. 

रॅलीची शासकीय मैदानात सांगता झाली. त्यानंतर याच ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम व नगरसेवक पदाच्या 29 उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेला राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शेतकरी नेते दिनकरराव पावडे, कामगार नेते विजय पिदुरकर, रवि बेलुरकर यांनी संबोधित केले. सभेत मान्यवरांसह विद्या खेमराज आत्राम व सर्व  उमेदवार मंचावर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सभेला संबोधित करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वणीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला. ते म्हणाले, “40 वर्षांपासून झुडपी जंगल जागेवर वसलेल्या नागरिकांना पट्टे वितरित केले जातील. 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीच्या सर्व जमीनमालकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन अधिकृत करू.” लाडकी बहीण योजनेची मजबुती करण्यासाठी वणीतील 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. तसेच संपूर्ण वणी शहरात सीसीटीव्हीचे जाळे बसवण्याची घोषणा त्यांनी केली. 

विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर विद्या आत्राम 
बावनकुळे यांनी विकासाची गाडीचे एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि चौथे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार असे सांगितले. “या गाडीला योग्य ड्रायव्हर मिळाल्यास ती शंभरच्या वेगाने धावेल, आणि तो ड्रायव्हर म्हणजे विद्या खेमराज आत्राम. जनतेने 2 डिसेंबरला भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडून आणावे,” असे आवाहन केले. यावेळी सभेत जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.

“वणीचा विकास हा आमचा संकल्प आहे. या घोषणांनी जनतेला दिलासा मिळेल.” असे मनोगत मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. सभेत माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शेतकरी नेते दिनकरराव पावडे, कामगार नेते विजय पिदुरकर, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, अंकुश बोढे, गजानन विधाते, प्रा. महादेव खाडे, प्रदीप जेऊरकर, मीरा पोतराजे, अविनाश लांबट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक उमेदवार, कार्यकर्ते व मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

Comments are closed.