भास्कर राऊत, मारेगाव: नेत येथील रेशन धारकाकडून रेशनचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गावाकऱ्यांनी दिली आहे. रेशन धारक हा लाभार्थ्यांना धान्य देण्यास टाळाटाळ करत असून याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप आहे. याबाबत गावक-यांनी पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्वर संभाजी शंभरकर हे नेत येथील राशनधारक आहे. डिसेंबर महिन्यात या रेशनधारकाने लाभार्थ्यांचे थम्ब आणि आधार कार्ड हे दोनदा घेतले. परंतु त्यांना विकतचा माल देण्यात आला तर मोफतचे रेशन मात्र अद्यापही दिलेले नाही. याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. लाभार्थ्यांनी पावती मागितली असता पावतीसुद्धा मिळत नाही. असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
गावातील एका अंत्योदय धारक विधवेला शासनातर्फे मिळणारे 35 किलो धान्यसुद्धा न देता गेल्या 7 ते 8 महिन्यापासून फक्त 5 किलोच देण्यात येत असल्याचा सुद्धा आरोप आहे. याविषयी विचारणा केली असता आम्हाला जेवढे येते तेवढेच देतो अशाप्रकारचे उत्तरसुद्धा या रेशनधारकांकडून मिळाले. गावातील धान्य गावातील नागरिकांना न देता बाहेर गावातील नागरिकांना देण्यात येत असून याविरोधात नेत येथील नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे.
या रेशनचा काळाबाजार करणाऱ्या दुकानधारकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असेही या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. यावेळी किसन घायवन, जगन जांभुळकर, सूरज बोढेकर, प्रमोद पुसदेकर, शंकर चिताडे, भास्कर जांभुळकर, विशाल फरकाडे, पुष्पा कारेकर, केशव धंदरे, रामचंद्र फरकाडे, प्रवीण कारेकर, कवडू ढवळे यांचेसह अनेकांच्या या तक्रारीवर सह्या आहे.
