बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना फैजल खान तर्फे 200 ब्लँकेटचे वाटप

फैजल यांनी सामाजिक व धार्मिक सलोखा जपत दिले एकतेचे दर्शन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: परसोडा येथे सुरु असलेल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात भाविक आले आहेत. यातील मोठ्या प्रमाणात भाविक मुक्कामी आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे. परसोडा हा भाग गावाबाहेर असल्यामुळे मंडपात भाविकांना थंडीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन फैजान खान यांनी पुढाकार घेऊन गरजू भाविकांना 200 ब्लँकेटचे वाटप केले. बाहेरगावाहून आलेले भाविक आपले पाहुणे असून त्यांची सेवा करणे आपले कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी फैजल यांनी दिली.

शनिवारी दिनांक 27 जानेवारीपासून परसोडा येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून भाविक आले आहेत. फैजान बशीर यांनी धार्मिक सलोखा म्हणून सोमवारी दिनांक 29 जानेवारी रोजी कथा मंडपाला भेट दिली होती. दरम्यान त्यांनी भाविकांशी चर्चा केली असता त्यांना काही भाविकांना ब्लँकेटची गरज असल्याची बाब कळली.

फैजल आणि त्यांचे सोबत असलेले सोहन उपाध्ये यांनी काही तासातच 200 ब्लँकेट विकत घेतल्या. त्याच दिवशी रात्री त्यांनी भाविकांची भेट घेत गरजूंना ब्लँकेटचे वाटप केले. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे. 

बाहेरगावाहून आलेले भाविक आपले पाहुणे – फैजल खान
विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्ये आहे. समाजात सर्व धर्मीय गुण्या गोविंदाने राहतात. गरजूंची सेवा ही सर्व धर्माची प्रमुख शिकवण आहे. सध्या सामाजिक, धार्मिक सलोखा टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला भेट दिली. बाहेरगावाहून आलेले भाविक हे आपले पाहुणे आहेत. थंडीमुळे भाविकांना ब्लँकेटची गरज असल्याचे कळले. आपल्या पाहुण्यांना कोणताही त्रास होऊ नये, हे आपले कर्तव्य असल्याने ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबवला.
– फैजल बशीर खान, वणी

Comments are closed.