अपघात – धार्मिक कार्यक्रमातून परतणा-या दुचाकीचा भीषण अपघात

महिला भाविक जागीच ठार तर दोघे जखमी, झोल्या फाट्याजवळील घटना,

विवेक तोटेवार, वणी: वणीहून चंद्रपूरला जाणा-या बसने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली. तर दुचाकी चालक व मागे बसलेली एक महिला असे दोघे जण जखमी झाले आहेत. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास झोल्या फाट्याजवळ ही घटना घडली. जयश्री शंकर उमाटे असे मृत महिलेचे नाव असून ती भद्रावती येथील रहिवासी आहे. वणीत सुरु असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या भद्रावतीहून वणीला आल्या होत्या. अशी माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, भद्रावती येथून मृतक जयश्री शंकर उमाटे (49) रा. सूर्यमंदिर वार्ड या त्यांचा मुलगा प्रतीक शंकर उमाटे (25) व जाऊ चित्रा सुरेश उमाटे (55) यांच्यासह दुचाकीने ट्रिपल सिट (MH34 CE3120) वणीला एक धार्मिक कार्यक्रम ऐकण्यासाठी आल्या होत्या. दुपारी 4 वाजता कार्यक्रम संपल्यावर त्या मुलासह भद्रावतीला परत जात होत्या. 4.30 वाजताच्या दरम्यान झोला फाट्याजवळ दुचाकी चालवणा-या मुलाचे  दुचाकीवरचे नियंत्रण सुटले व दुचाकी खाली पडली. यात चालक प्रतिक व त्याची मोठी आई चित्रा या रस्त्यावर पडल्या तर जयश्री या डिव्हायडरवर पडल्या. 

दरम्यान याच वेळी वणी-चंद्रपूर (MH14 HG 8227) ही बस वणीहून चंद्रपूरला जात होती. अचानक दुचाकी रस्त्यावर पडल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने बस डिव्हायडरवर नेली. मात्र डिव्हायडरवर जयश्री पडल्याने बसचे चाक जयश्रींच्या डोक्यावरून गेले. यात जयश्री यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा व जाऊ खाली पडल्याने जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळावर ये-जा करणा-या लोकांनी गर्दी केली. उपस्थित लोकांनी एम्ब्युलन्स बोलावली व पोलिसांना देखील याची माहिती दिली.

बसने दुचाकीला धडक दिल्यानेच दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले, अशी देखील माहिती मिळाली आहे. जखमींना वरोरा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.  

हे देखील वाचा- 

बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना फैजल खान तर्फे 200 ब्लँकेटचे वाटप

Comments are closed.