कष्टकरी, शेतक-यांचा आवाज हरपला.. कॉ. शंकरराव दानव यांचे निधन

आज पहाटे मालवली प्राणज्योत. दु. 3 वा. राहत्या घरून अंत्ययात्रा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, शेतकरी, कामगारांचे आवाज म्हणून ओळख असलेले कॉ. शंकरराव दानव यांचा मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. आज बुधवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास त्यांना मृत्यूने कवटाळले. ते 75 वर्षांचे होते. कॉ. शंकरराव ह्यांना दि. २७ जानेवारी रोजी हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 75 व्या वर्षांपर्यंतही ते विविध आंदोलनात सहभागी राहत होते. काही काळ ते नगरसेवक देखील होते. आज दुपारी 3 वाजता विठ्ठलवाडी येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच राज्यभरातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. तर कार्यकर्त्यांनी पोरके झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

कॉ. शंकरराव ह्यांचा जन्म १९४८ ला एका गरीब कुटुंबात झाला. त्यांची संपूर्ण हयात गरिबीत गेली. पक्ष व जनतेचा कार्यात ते एवढे गुंग असायचे की सायंकाळी त्यांचा घरी स्वयंपाक शिजेल की नाही ह्याची सुद्धा शाश्वती नसायची. कठीण अवस्थेत त्यांचा परिवार जगत होता. कमी वयात त्यांचा मोठा मुलगा राहुलने कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली. कॉ. शंकरराव हे सातत्याने खेड्यापाड्यात पायदळ तर कधी सायकलने फिरत राहिले. दलित, आदिवासी, शेतमजूर ह्यांचे संघटन बांधत राहिले, त्यांचा संघर्ष सुरूच ठेवला.

कॉ. शंकरराव दानव हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील संस्थापक सदस्य होते. यवतमाळ जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जनतेचा प्रत्येक समस्येशी असलेल्या संघटना त्यांनी उभारल्या होत्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते वयाचा १५ व्या वर्षी पासून ते आज शेवटचा घटका पर्यंत ते कार्यरत होते. दवाखान्यात त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी ताबडतोब मला येथून घेऊन चला, मला यवतमाळ जायचे आहे, तिथे महिलांचा संघर्ष सुरू आहे, मला तिथे जायचे आहे, असे त्यांचे वाक्य होते. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. त्यांना पुन्हा एकदा झटका आला व ते कोमात गेले. त्यानंतर ते कोमातून परत आलेच नाहीत.

कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांचा आवाज
कॉ. शंकरराव दानव ह्यांनी विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, फेरी, कोळसा कामगार, नगर परिषद कर्मचारी, जिनिंग प्रेस कामगार, चुनाभट्टी कामगार, चुना दगड कामगार, आशा व गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका अश्या कितीतरी संघटना बांधून सर्वांना न्याय देण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करीत होते. त्यांनी अनेक दीर्घ लढे करून पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वन जमीन कसनाऱ्यांना त्यांना हक्काची जमीन मिळवून दिली तर अनेकांना ती मिळवून देण्यासाठी आजही त्यांचा संघर्ष सुरू होता.

कॉ. शंकरराव हे कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते ज्यामध्ये. कॉ.ए. बी. बर्धन,वासुदेव आचार्य, बी. टि. रणदिवे, वृंदा करात, डॉ.अशोक ढवळे अशा कितीतरी नेत्यांसमावेत खांद्याला खांदा लावून काम करीत राहिले. ते अनेक आघाड्यांवर काम करीत असल्याने त्यांना सगळीकडे बहुमान होता. त्यांचा कडे संघर्षाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी ऐकून घेतल्या जात होते. अश्या ह्या पुढाऱ्यांचे अवेळी एकाएकी निघून जाणे पक्ष, जन आघाड्या व कार्यकर्त्यांना खूप मोठी हानी झालेली आहे. त्यांचा जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते पोरके झाले आहेत, एवढे मात्र नक्की!

Comments are closed.