विवेक पिदूरकर, शिरपूर: सोशल मीडित सध्या कपल चॅलेंजचा धुमाकूळ सुरू आहे. पण कपलने म्हणजेच नवरा-बायकोच्या जोडीनेच रक्तदान करून ढोके दंपतीन वेगळ्याच स्टाईलने कपल चॅलेंज स्वीकारलं. नातं शक्यतो रक्तावरून ठरवतात. रक्ताच्याही पलीकडचं एक मोठं नातं आहे. ते म्हणजे माणुसकीचं.
हेच नातं जोपासत 80 लोकांनी वणीत रक्तदान केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज वाढत आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक धनोजे कुणबी समाज विकाससंस्थेने रविवारी हे शिबिर घेतलं होतं. स्थानिक साधनकरवाडी येथील धनोजे कुणबी समाज भवनात हे शिबिर यशस्वी झालं.
कोरोना या संसर्गजन्य रोग महामारीच्या काळात रुग्णांना रक्ताची किंवा त्यातील घटकांची गरज असते. सामाजिक भान जोपासत या रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. विशेष बाब म्हणजे या शिबिरात श्री. सचिन ढोके व सौ हर्षा सचिन ढोके या पतीपत्नीने एकत्रित रक्तदान करून, आजच्या काळात कपल चॅलेंजच्या नावाखाली सोशल मीडियावर मिरवणाऱ्या तरुणांना आदर्श उदाहरण प्रस्तुत केले.
या शिबिराला वणी शहरातील विविध गणमान्य लोकांनी सदिच्छा भेट देऊन कौतुक केले. तसेच याच कार्यक्रमामध्ये आयोजकांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी जगदीश ढोके, ड़ॉ जगन जुनगरी, विकास जेणेकर, सचिन ढोके, प्रदीप बोरकुटे, हरीश पिदुरकर, देवेंद्र खरवडे, सचिन पिंपळकर, संतोष ढुमणे, मंगेश रासेकर, विकास देवतळे, विशाल कुंभारे, प्रवीण भोयर, विनोद घुंगरूड, मारोती महातळे, छगन कुचनकर, संदीप पोतराजे, नितीन मोवाडे यांसह अनेकांनी परिश्रम घेतलेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)