वणीतील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्रच नाही

अहवाला अभावी रुग्णांवर उपचारास विलंब, केंद्रासाठी निवेदन सादर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्रच नाही. त्यामुळे रुग्णांच्या रक्ताचे नमुने पांढरकवडा येथे पाठवावे लागतात. याचा मोठा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वणी येथे रक्त तपासणी केंद्र उपलब्ध करून द्यावे, तसेच ग्रामीण रुग्णालयातील इतरही समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी प्रशांत गाडगे व नागरिकांनी आरोग्य मंडळाच्या उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील रुग्णांसाठी वणीत ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात असून येथे विविध आजारांसाठी रक्त तपासणी करण्यात येते. यासाठी संबंधित रुग्णांच्या रक्ताचे नमुने सुद्धा घेण्यात येते. परंतु रक्त तपासणी नमुने हे पांढरकवडा येथील तपासणी केंद्रात पाठविण्यात येत असून त्याचा रिपोर्ट विलंबाने येतो. अशा परिस्थितीत एखाद्या रुग्णाला गंभीर आजार असल्यास व रक्त तपासणी अहवालाअभावी संबंधित रुग्णाला आवश्यक उपचार वेळेत प्राप्त न झाल्यास जीवसुद्धा गमवावा लागतो.

त्यामुळे स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने याबाबत पुन्हा स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज 500 ते 600 रुग्णांची तपासणी केली जात असून औषधी विभागात एक मदतनीस नेमण्यात यावा, ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीनुसार औषधासाठी उपलब्ध करून द्यावा, स्नेक बाईट व डॉग बाईटसंबंधी औषधांचा साठा नेहमी तयार ठेवावा,

येथे कोट्यवधी रुपये खर्च करून ट्रामा केअर सेंटर तयार करण्यात आले. मात्र ते धूळ खात पडले असून ते तातडीने सुरू करण्यात यावे, यासह इतरही मागण्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी प्रशांत गाडगे, दीपक गोहणे, अजय बोंडे, आनंद पाझारे, हेमकांत टोंगे, नरेंद्र वाळके, बुद्धघोष लोणारे, पूजा सिडाम, लीलाराम सिडाम, राजेंद्र खोब्रागडे, संदीप दुपारे, रज्जत सातपुते, आकाश बोरकर, गौरव जवादे, नरेंद्र वाळके आदींनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.