कुंभा गावासाठी ग्राम परिवर्तन पॅनलची धमाकेदार ब्ल्युु प्रिंट
परिवर्तनच गावाचा कायापालट करू शकते: अरविंद ठाकरे
नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहे. शुक्रवारी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व चैनल पॅनल कामाला लागले आहे. दरम्यान कुंभा गावात पन्नास वर्षात कोणताही विकास झाला नाही असा आरोप करत अरविंद ठाकरे यांनी ग्राम परिवर्तन पॅनलची ब्लू प्रिंट स्पष्ट केली.
काय आहे गावाचा जाहीरनामा?
बस स्थानक पासून गावापर्यंत येणाऱ्या मार्गावर लाईटची व्यवस्था नसल्याचे प्रवाशांना व गावात येणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बस स्टॉप ते गावापर्यंत स्ट्रीट लाईट लावणे हे काम प्राथमिकतेने केले जाईल. गावात अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता गावात डिजिटल शाळा उभारणे तसेच क्रीडाप्रेमींना खेळण्यासाठी क्रीडा संकुल उभारणे. गावातील व्यक्तींचे स्वास्थ ठीक राहावे याकरिता गावात आधुनिक व्यायामशाळा निर्माण करणे.
गावात स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे गावात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करणे. गावात पाण्याची मोठी समस्या आहे त्यामुळे प्रत्येक घरात पाणी मिळायला पाहिजे यासाठी पाण्याची व्यवस्था करणे. प्रत्येक महिन्याला मशीनद्वारे नाल्यांची साफसफाई करणे.
गावातील अनेक बेरोजगार मुले स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेरगावी जातात. त्यांना गावातच स्पर्धापरीक्षेची तयारी करता यावी यासाठी गावात सुसज्ज अशी लायब्ररी व अभ्यासिका तयार करणे. सांस्कृतिक भवनाची डागडुजी करून तिथे सातत्याने सामाजिक उपक्रम, विविध सामाजिक हिताचे तसेच कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
सौंदर्यीकरणा अंतर्गत बस स्थानकावर मोठे प्रवेशद्वार लावणे. गावातील प्रत्येक वार्डात सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करणे. आधुनिक मशीन द्वारा दर महिन्याला गाव निर्जंतुक करणे. गाव स्वच्छ राहावा यासाठी गावात घनकचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करून देणे. प्रत्येक घरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी ओला व सुका कचराकुंडी उपलब्ध करून देणे. मच्छरांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावात बंदिस्त नाले व व गटारे तयार करणे. रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील गरजू व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत करणे. गुराढोरांना पाणी पिण्यासाठी पाठवठे तयार करणे.