अखेर विदर्भा नदीत बेपत्ता झालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

देवीच्या घट विसर्जनादरम्यान घोन्सा येथील शेतमजूर गेला होता वाहून

विवेक तोटेवार, वणी: काल घोन्सा येथील राजू श्रीहरी बोरकुटे ही व्यक्ती दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नदीवर देवीचा घट विसर्जीत करताना पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. राजूचा कालपासून शोध सुरू होता. आज सकाळी यवतमाळ येथील रेस्क्यू टीम घोन्सा येथे दाखल झाली होती. सकाळी सुमारे 9 वाजेपासून 11 जणांची टीम राजूचा शोध घेत होती. अखेर 1 वाजून 7 मिनिटांनी गावापासून अर्धा किलोमीटर अनंता काकडे यांच्या शेताजवळ राजूचा मृतदेह आढळून आला. 

राजू उर्फ जीवनदास श्रीहरी बोरकुटे (50) हा बाहेरगावातील रहिवाशी असून तो घोन्सा येथील एका शेतक-याकडे तो सालगड्याचे काम करायचा. गेल्या 10 वर्षांपासून तो गावातच त्याची पत्नी व मुलीसह राहायचा. घोन्सा परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्याला पुराचे स्वरूप आले आहे. विदर्भा नदी देखील पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे.

शनिवारपासून दुर्गा विसर्जनाला सुरूवात झाली. राजूच्या मालकाच्या घरी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. शनिवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास राजू काही महिला व त्याच्या पत्नीसह देवीचा घट विसर्जित करण्यासाठी गावालगत असलेल्या विदर्भा नदीच्या पात्रात गेला होता. घट विसर्जन करताना राजूच्या पायातील चप्पल नदीच्या पाण्यात वाहून गेली. चप्पल पकडण्यासाठी राजू नदी पात्रात गेला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने राजू प्रवाहात वाहून गेला.

राजू वाहून जाताच घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती प्रशासनाला दिली. गावातील काही व्यक्तींनी नदी पात्रात राजूचा शोध घेतला. मात्र संध्याकाळपर्यंत राजू आढळून आला नाही. अखेर आज रविवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथून 11 लोकांची एनडीआरएफची रेस्क्यू टीम घोन्सा येथे दाखल झाली. सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी नदीच्या पात्रात राजूचा शोध घेण्यास सुरूवात केली. राजूचा युद्धपातळीवर शोध सुरू होता.

अखेर 1 वाजून 7 मिनिटांनी कायर गावाकडील नदीच्या प्रवाहात अनंता काकडे यांच्या शेताजवळ राजूचा मृतदेह आढळून आला. राजूच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात  हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना गावासह आजूबाजूच्या गावातील ही लोक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गोळा झाले होते.

हे देखील वाचा:

धावत्या दुचाकीवर आदळला रोही, साईनगरी येथील तरुणाचा मृत्यू

थोडक्यात महत्त्वाच्या क्राईम अपडेट

Comments are closed.