बोटोणीच्या ‘त्या’ कुटुंबासाठी डॉ. लोढा ठरले देवदूत
आजारपणामुळे मुलाला अपंगत्व तर वृद्ध वडील आजारी
ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील आदिवासी बहुल गाव बोटोणी येथील तोडसाम कुटुंबावर काही वर्षांपुर्वी झालेला आघात ते कुटुंब पेलू शकले नाही. आजारपणामुळे अपंगत्व आलं. त्यात पत्नी ही सोडून गेली. घरी वृद्ध आई वडील. घरचा कमावता व्यक्ती अंथरुणाला खिळल्याने प्रचंड हालअपेष्ठा सहन करत हे कुटुंब दिवस काढत होते. ही घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांना कळताच ते त्या कुटुंबाच्या मदतीला धावून गेले. गेल्या सहा महिन्यांपासून ते या कुटुंबाला मदत करत असून आयुष्याभर त्यांना ही मदत देत राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली. बुधवारी त्यांनी या कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबाची विचारपूस केली.
बोटोणी येथे वामनराव तोडसाम (70) राहतात. त्यांच्या पत्नी रेवतीबाई (67) मुलगा सुहास (35) व सून असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. आई वडील वृद्ध असल्याने कुटुंबाची जबाबदारी सुहासवर होती. सुहास मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता. मात्र त्यातच अशी घटना घडली की तोडसाम कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली. सुहासला अर्धांगवायूचा झाला. त्यामुळे त्याला अपंगत्व आले. त्यामुळे सुहासचे काम बंद झाले. घरी एकटाच कमावता असल्याने तोडसाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घरी नवरा आजारी असल्याने त्याची पत्नी ही त्याला सोडून गेली. वडील वृद्ध असल्याने त्यांच्याकडून काम होत नव्हते. त्यातच ते पण वृद्धापकाळाने आजारी पडले. काही दिवस गावातील लोकांनी रेवतीबाईंना मदत केली. मात्र कोण किती दिवस मदत करणार. अखेर या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. दरम्यान ही घटना डॉ. महेंद्र लोढा यांना कळली. त्यांनी तातडीने तोडसाम कुटुंबाची भेट घेत त्यांच्यासाठी किराणा, औषधोपचार याची व्यवस्था केली. गेल्या सहा महिन्यांपासून ते या कुटुंबाला मदत करत आहेत.
बुधवारी दिनांक 30 जुलै रोजी त्यांनी तोडसाम कुटुंबाची भेट घेतली. अजो पर्यंत या कुटंबाला गरज आहे तो पर्यंत या कुटंबाला मदत करत राहणार. तसेच अपंग झालेल्या सुहासला एखादा गृहउद्योग टाकून देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याची हमी देखील यावेळी डॉ. लोढा यांनी दिली. यावेळी राजाभाऊ बिलोरिया, अंकुश माफुर, यांच्यासह मारेगाव व वणी येथील कार्यकर्ते उपस्थित होते.