रस्ता व पुलाच्या कामासाठी झोला व वडगाववासी आक्रमक
सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वडगाव ते झोला रस्त्यावरील दोन्ही गावाकडील नाल्यावरच्या पुलाची उंची वाढवणे, दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, पुलाचे मजबूत बांधकाम करावे व दोन्ही बाजूने रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी झोला व वडगाव वासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्त्वात हे निवेदन देण्यात आले. जर मागणी लवकरात लवकर ही मागणी मान्य झाली नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा झोला व वडगाववासीयांनी दिला आहे.
वडगाव ते झोला या रस्त्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात नाल्याला पूर आला की इथे मोठ्या प्रमाणात कचरा अटकतो. प्रवाहामुळे आलेल्या दाबामुळे भोंग्यावर टाकलेले काँक्रीटचे रपटे पाण्याच्या प्रवाहात वारंवार वाहून जाते. या मार्गाने शेतकऱ्यांची बैलगाडी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक केव्हाच बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना, शेतमजूरांची ने-आण करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच शेतातील निघणारा शेतमाल घरी कसा आणायचा असा प्रश्न पडला आहे. शिल्लक असलेला २ फुटांचा रस्ता सुद्धा खचून वडगाव झोला रस्त्याचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून बांधकाम विभागाने डागडुजी व थातूरमातूर कामासाठी फक्त 3 लाख 21 हजाराचे काम मंजूर केले.
झोला गावाकडील पुलाची तर या विभागाने दखलच घेतली नाही. हा पूल एकदम खाली असल्यामुळे व पुलाखाली भोंगे नसल्यामुळे पुलावरून सतत पाणी वाहत राहते. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पूल पार करावा लागतो. त्या ठिकाणी रस्त्याला भेगा पडलेल्या असल्यामुळे व रस्त्याची माती वाहून गेल्यामुळे बरेच अपघात होत आहेत.
या परिसरातील नांदेपेरा, रांगणा, भुरकी, शेलू तसेच लगतच्या आजूबाजुच्या गावातील गावकरी सुद्धा वरोरा-चंद्रपूर कडे जाण्यासाठी वडगांव झोला याच रस्त्याचा उपयोग करतात. परंतू या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब असल्यामुळे शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना व प्रवाशांना जाण्या-येण्यास खुपच मनस्ताप होत आहे.
वडगांव ते झोला या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करुन डांबरीकरण करण्यात यावे. तसेच या दोन्ही गावांकडील नाल्यांवर असलेल्या पूलांची उंची वाढवून मजबूत पूल बांधून देण्यात यावा व नाल्याच्या बाजूने संरक्षक भिंत बांधून देण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी केलेली आहे.तसेच हे निवेदन मिळताच ७ दिवसांच्या आंत वडगांव पूला जवळचा रस्ता दुरुस्त करुन गांवकऱ्यांना वाहतुकी योग्य सुरळीत सुरु करुन न दिल्यास मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देवून कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
निवेदन देतान मनोज ढेंगळे यांच्या सोबत महादेव चहानकर, लहानू सालुरकर, निलेश सातपुते, विकास रासेकर राजू रासेकर, रवी ढोके, सुधीर जुनघरी, विवेक रासेकर, विजय रासेकर, परमेश्वर सालुरकर, सुधीर सालुरकर, खुशाल बोरकर, शुभम बावणे, गणेश सालुरकर इत्यादी वडगाव व झोला गावातील गावकरी उपस्थित होते.
Comments are closed.