सुशील ओझा, झरी: झरी येथील भाऊ बहिणीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची काळीज पिळवून टाकणार घटना रविवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.
झरी येथे तुळशीराम धुर्वे (48) हे गरीब आदिवासी व्यक्ती त्यांच्या कुटुंबियांसोबत राहायचे. त्यांच्या कुटंबात त्यांची पत्नी, दोन मुलं व बहीण असे एकत्र कुटुंब होते. तुळशीराम जवळ थोडीफार शेती होती. त्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. १२ जुलै च्या रात्री तुळशीराम धुर्वे याला चक्कर येऊन ओकाऱ्या सुरू झाल्या. त्यात ते बुशुद्ध पडले. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले.
झरीमध्ये त्यांची तब्येत जास्त बिगडल्याने त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्याजवळ गरिबीमुळे उपचारासाठी पैसे देखील नव्हते. त्यामुळे त्यांनी उसनवारीवर १० हजार रुपये घेतल्याचे कळते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर रविवार १५ जुलैच्या रात्री ११ वाजता त्याची प्राणजोत मालवली.
तुळशीरामच्या घरीच त्यांची लहाण बहीण कुसुम धुर्वे (४५) ही राहायची. तिला कॅन्सरचा आजार होता. तिच्या जवळील औषधी संपल्या होत्या. त्या आणण्याकरिता पैसे जुळत नव्हते. पैशाअभावी तिला कधी औषधी मिळायची तर कधी नाही. त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाली. अखेर तिनेही आपले प्राण त्यागले. विशेष म्हणजे दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाला. रात्री 8 वाजता बहीण कुसुमचा तर रात्री ११ वाजता भाऊ तुळशीराम यांचा मृत्यू झाला.
दोघांच्या मृत्यूची एकाच वेळी माहिती मिळाल्याने संपूर्ण ग्रामवासियांना धक्का बसला. तुळशीराम हे गरीब होते. त्यांच्या पश्चात पत्नी व २ लहान आहेत. आता त्यांचे कसे होईल हा प्रश्न सर्वांना सतावतोय.
मृतक तुळशीराम यांना दुपारी यवतमाळ येथून झरी येथे आणले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोघांचाही अंत्यविधी करण्यात आला. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.