राजकीय पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते बनलेत ठेकेदार

लोकप्रतिनिधींच्या नावांचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव

0

सुशील ओझा, झरी,तालुका: तालुक्यातील विविध निधीतील कामाकरिता राजकीय पुढारी पदाधिकारी व कार्यकर्तेच ठेकेदार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गरीब लहान ठेकेदारांवर संकट आले आहे. त्यातही लोकप्रतिनिधींच्या नावांचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यात खनिज विकासनिधी अंतर्गत शाळेच्या वॉल कंपाउंड, समाज भवन वॉलकंपाउंड तसेच काही ग्रामपंचायत अंतर्गत १४व्या वित्त आयोगातून सिमेंट काँक्रीट रस्ते व इतर अनेक कामे सुरू आहेत. या सर्व कामांकरिता फक्त राजकीय पुढारी पदाधिकारी व कार्यकर्तेच अग्रेसर असल्याचे बोलले जाते.

निकृष्ट कामांबाबत ग्रामवासी किंवा अधिकारी यांनी विचारणा केल्यास लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर करून दबाव टाकला जात असल्याची ओरड आहे. काही पुढारी “इकडून तिकडे व तिकडून इकडे” असे पक्षांत उड्या मारून स्वतःची ठेकेदारी करीत आहेत. तर काही कार्यकर्ते ज्याला धड बोलता येत नाही व काही दिवसातच स्वतःला मोठा लोकप्रतिनिधी समजून ठेकेदारी करण्यात लागलेत.

पुढारी किंवा कार्यकर्त्यांच्या ठेकेदारीमुळे गावपातळीवरील लहान ठेकेदारी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राजकीय ठेकेदारी करणाऱ्याजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नसून दुसऱ्याच्या नावावर कामे घेऊन ठेकेदारी करीत आहे. तालुक्यातील शाळेचे वॉलकंपाउंड समाजभवन कंपाउंड गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामात रेतीचा अवैध वापर करीत आहे. एकूणच तालुक्यातील सर्वच कामांचा ठेका राजकीय पुढारी अथवा कार्यकर्त्यांनी घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राजकीय पुढारी जनतेला खोटी आश्वासने देऊन मते मागण्याचे काम करतात. ती आश्वासने पूर्ण होत नाहीत. गुंतवलेले पैसे काढण्यासाठी गैरमार्गांचाही अवलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच प्रथा संपूर्ण तालुक्यात सुरु आहे. गेल्या दोन तीन वर्षात आरओ प्लांट, सिमेंट रोड, वॉलकंपाउंडची सर्व कामे राजकीय पुढारी व कार्यकर्यांनीच केल्याचे दिसत आहे.

राजकीय ठेकेदारांच्या बहुतांश कामात रेतीचा वापर न करता काळ्या चुरीचा वापर केला जात आहे. वीट जुडाई व भिंत छपाईकरिता काळ्या चुरीचा वापर केला जात आहे. याकडे संंबंधित विभागाचे अर्थपूर्ण व राजकीय दबावामुळे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये खनिज विकासनिधीतून आरोप्लान्ट बसविण्यात आलेत.

एक प्लांट ७ लाख ५० हजार रुपये प्रमाणे बसविण्यात आले . त्यातील ९० टक्के आरओ प्लान्ट आज बंद अवस्थेत आहे. ३ लाख ५० हजारांचा आरो प्लांट साडे सात लाखांत लावण्यात आला. तरीही ९० टक्के आरओ प्लांट आहेत. यावरून किती चांगले काम व उत्कृष्ट वस्तू वापरण्यात आल्यात हे दिसून पडले आहे.

अशा ठेकेदारी करणाऱ्या पुढारी कार्यकर्त्यांमुळे जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे, तर त्या पक्षांच्या प्रतिमा मलीन होत आहेत. तालुक्यात काही पुढारी व कार्यकर्त्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.