सीतादेवीच्या कापूस वेचणीसह सोयाबीन काढणीस प्रारंभ

खासगी बाजारात हमी भावाला बगल

0

विलास ताजने, वणी: सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडलेल्या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काढणीस आलेली पिके पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालीत.पावसामुळे पिकांची काढणी थांबली होती. परंतु सध्या पावसाने उघडीप दिल्याने सीतादेवीच्या कापूस वेचणीसह पिके काढणीच्या कामाला वेग आला. तरीही खासगी बाजारात हमी भावाला बगल दिल्याचे चित्र दिसत आहे.

वणी तालुक्यात यंदा खरीप पिकांची लागवड मृग नक्षत्रात झाली. चांगल्या वातावरणात पिके जोमाने वाढलीत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी समाधानकारक होता. मात्र ऐन कापूस वेचणी आणि सोयाबीन कापणीच्या वेळेस प्रचंड प्रमाणात पाऊस पडला. सतत पडणाऱ्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचा आनंद चिंतेत बदलला. नाईलाजाने शेतकऱ्यांना पावसामुळे पिकांची कापणी, काढणी थांबवावी लागली.

आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सीतादेवीची कापूस वेचणीस सुरुवात झाली. कापूस वेचणी दर प्रति किलो 5 रुपये आहे. सोयाबीन कापणी प्रति एकर 2 हजार रुपये आहे. सोयाबीन काढणी 200 रुपये प्रति क्विंटल आहे. कापणी आणि काढणी सुरू आहे. मात्र बहुतांश पांदण रस्ते चिखलाने माखलेले असल्याने ट्रॅक्टर मळणी यंत्र, बैलगाडी शेतापर्यंत ने-आण करता येत नाही.

त्यामुळे अडचणीत शेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची कापणी करून शेतातच ढिगारे उभी केली आहे. पावसापासून कापलेले पीक ओले होऊ नये यासाठी प्लास्टिक फाळीने ढिगारे झाकावी लागत आहे. त्यामुळे फाळी खरेदीसाठी शेतकऱ्यांना तीन चार हजार रुपये खर्च करावे लागतात.

बहुतांश शेतकरी आर्थिक अडचणीमुळे सोयाबीन विक्रीस खासगी बाजारात आणत आहे. मात्र ओलाव्याच्या नावाखाली सोयाबीन प्रति क्विंटल 3200 रुपये पर्यंत खरेदी केले जात आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.