विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मुंगोली इथून पेटत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या कडे लक्ष द्यावे अशी मागणी मुंगोलीवासी करीत आहे.
मुंगोली, कोलगाव, पैनगंगा (विरूर) जिल्हा चंद्रपूर, या तिनही खाणीतील कोळशाची वाहतूक घुग्गुस सायडिंगला केली जाते. या वाहतुकीचा मार्ग पैनगंगा पूल साखरा ते वर्धा पूल मुंगोली असा आहे. या रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. तसेच याच रस्त्यावरून मुंगोलीवासीयांचीही वाहतूक असते.
मंगळवारी सकाळी मुंगोली जवळ पैनगंगा (विरूर) येथून घुग्गुस सायडींगला घेऊन जाणा-या ट्रकमधून जळता कोळशाची वाहतूक होताना आढळून आले. हा रस्ता नेहमीच्या रहदारीचा असल्याने ही एक गंभीर बाब आहे. यासोबतच या रस्त्याने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूकही केली जाते. या गंभीर प्रकाराकडे वेकोलि प्रशासन, ट्रान्सपोर्ट आणि वाहतूक विभागाने लक्ष घालावे अशी मागणी मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी केली आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा जळत्या कोळशाचा ट्रकचा व्हिडीओ….