ब्युरो, मुंबई: राज्य शासनाने दि. २७ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इ) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्या विषयी मोटार वाहन विभागाच्या 022 . 62426666 या निःशुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात यावीए असे परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत सुचीत करण्यात आले आहे. मुंबईसाठी 1800220110 या निःशुल्क क्रमांकावरही तक्रार नोंदवता येईल. तसेच तक्रारी विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर देखील तक्रार दाखल करता येऊ शकेल.
तक्रारी संदर्भाने उचित चौकशी अंती संबंधित कंत्राटी बस परवाना धारकांच्या परवान्यावर निलंबनाची / रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. या शासन निर्णयान्वये खासगी कंत्राटी वाहनांना (बस, ट्रॅव्हल्स इ.) यांना गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी बसच्या तुलनेत जास्तीत जास्त दिडपट भाडे आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.