पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यात वाढलेले अवैध धंदे, वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, सातत्याने होणा-या दुचाकी चोरी व घरफोडी या विरोधात रामनवमी उत्सव समिती आक्रमक झाली आहे. काही दिवसांआधी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर यांनी या प्रश्नांवर पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाला एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र केवळ थातुरमातूर कार्यवाही होत असल्याने आता 3 जानेवारीपासून स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. दिनांक 9 जानेवारी रोजी स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना देण्यात येणार आहे.
निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे (मटका, जुगार, कोंबडबाजार, झंडीमुडी, चेंगळ, कोळसा तस्करी, रेती तस्करी, ड्रग्स) या सारखे अवैध धंदे जोमात सुरु आहे. घरफोडी, चोरी सर्रास सुरु आहे. घरफोडीच्या एकाही प्रकरणाचा छडा पोलिसांना लावता आला नाही. तसेच वणी शहरात अवैध वाहतुक, बेधुंद टुव्हिलर गाडी अल्पवयीन मुले चालवित असून तसेच वणी शहरात अॅटोचा थैमान मुख्य मार्गाने दिसून येत आहे. यावर वाहतुक शाखेचे नियंत्रण नसल्यामुळे अवैध अॅटोचालकांची अरेरावी नागरीकांना पहावयास मिळत आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वणी शहर हे शांतताप्रिय असून जातीय धर्माचा कुठलाही वाद नसून सर्व नागरीक सलोख्याने राहतात. पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने गुंड प्रवृत्ती शहरात डोके वर काढत आहे. भाजी मंडईत तर भाजी विक्रीचे दुकान कमी, मात्र मटकापट्टीचे जास्त दुकाने असल्याचा आरोप रामनवमी उत्सव समितीने केला आहे.
शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
वणी शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. भररस्त्यावर चारचाकी वाहने उभी दिसतात. परिणामी वाहतूक जाम होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. ऑटो रिक्षाचालकांच्या तर दादागिरीला उधाण आले आहे. ऑटोचालकांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. यासह भरधाव दुचाकी चालवणा-या तरुणांचा उच्छाद शहरात सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. असाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
अवैध धंदे बंद होत पर्यंत लढा – रवि बेलूरकर
परिसरात सर्व प्रकारचे अवैध धंदे जोमात सुरु आहे. पोलीस प्रशासनाद्वारे यावर कार्यवाही होत नाही, असे नाही. मात्र ही कार्यवाही केवळ थातूरमातूर असते. त्यामुळे आता स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. यात शहरातील विविध सामाजिक संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना, शहरातील मान्यवर तसेच सर्वसामान्य नागरिकांचा स्वाक्षरी घेण्यात येत आहे. जो पर्यंत पोलीस प्रशासन सर्व अवैध धंदे बंद करीत नाही. तो पर्यंत या विरोधात लढा सुरु राहील.
– रवि बेलूरकर, अध्यक्ष, रामनवमी उत्सव समिती
गुरुवारी 9 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन त्यांना वणीतील सर्व अवैध धंद्याची माहिती देण्यात येणार आहे. तसेच योग्य ती कार्यवाही न झाल्यास रामनवमी उत्सव समिती शहरातील विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करणार, असा इशाराही देण्यात आला आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.