पेपर देऊन परत येताना विद्यार्थ्याला कारची धडक

एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. यात पेपर देऊन परत येत असलेला विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी 26 जून रोजी दुपारी 1.30 वाजताच्या वणीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ हा अपघात झाला. पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. 

मृतक शुभम सुशील रॉय (38) हा मुळचा चंद्रपूर येथील रहिवासी असून तो वणी येथे आयटीआय करायचा. सध्या कॉलेज संपल्याने तो चंद्रपूर येथे परत गेला होता. बुधवारी दिनांक 26 जून रोजी त्याचा पेपर होता. पेपरसाठी त्याचा भाऊ सुप्रसिद्ध राय व त्याचा मित्र साजिद इस्माईल शेख (38) रा. चंद्रपूर हे शुभमला घेऊन कारने वणीला आले होते. त्यांनी शुभमला कॉलेजमध्ये सोडले. पेपर संपायला तीन तास शिल्लक असल्याने दरम्यानच्या काळात मृतकाच्या भावाने आपली कार वॉशिंगसाठी दिली.

भावाचा पेपर संपल्यावरही कार वॉशिंग न झाल्याने मृतकाच्या भावाने वॉशिंग सेन्टरमधली एक दुचाकी (MH 29 BL 9259) शुभमला आणायसाठी मागितली. साजिद हा शुभमला आणायला आयटीआयमध्ये गेला. शुभमला घेऊन परत येत असताना दीड वाजताच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती एका भरधाव कारने (MH 34 BR 8065) यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

ही धडक इतर जबर होती की दुचाकी चालक उडून कारच्या काचेला धडकला व गंभीर जखमी झाला. तर त्याच्या मागे बसलेला शुभम हा खाली पडला. डोक्याला जबर इजा झाल्याने व तो जागीच ठार झाला. पोलिसांनी जखमीला व शुभमला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. साजिद याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.

या घटनेतील आरोपी कार चालक चंद्रभान लक्ष्मण धानोरकर (32) रा. वरोरा येथील रहिवासी आहे. तो रेल्वे विभागात कार्यरत आहे. सध्या युनियनची निवडणूक असल्याने तो वणी येथे आला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.