ट्रॅव्हल्सच्या वाहकाने गहाळ केले 1 लाख रुपयांचे मोबाईलचे पार्सल

'धन'श्रीचा असाही प्रताप, वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रॅव्हल्स बसमध्ये वणीहून मुकूटबन येथे पाठविण्यात आलेले मोबाईल हँडसेटचे पार्सल परस्पर गहाळ केल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. या कुरिअरमध्ये 1 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 9 मोबाईल हँडसेट होते. फिर्यादी महेश दिपचंद तातेड (40) रा. वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनश्री ट्रॅव्हल्सच्या वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे ट्रॅव्हल्सद्वारा पार्सल पाठवणा-यांमध्ये चांगलीच धडकी भरू शकते.   

तक्रारीनुसार फिर्यादी महेश तातेड याचे शहरातील जटाशंकर चौकात अरिहंत मोबाईल शॉपी या नावाने मोबाईलचे दुकान आहे. तर महेश यांच्या लहान भावाचे मुकूटबन येथे मोबाईल शॉपी आहे. महेश हे मुकुटबन येथील दुकानासाठी लागणारे आवश्यक असेसरीज व मोबाईल हँडसेट एका ट्रॅव्हल्सद्वारा चालवण्यात येणा-या कुरिअर सर्विस द्वारा पाठवतात.

दि. 23 मार्च रोजी महेश यांनी वणी येथील बालाजी ट्रान्सपोर्ट (धनश्री ट्रॅव्हल्स) मध्ये मुकुटबन येथे पाठविण्यासाठी कुरिअर पार्सल बुक केले. त्या पार्सलमध्ये विवो कंपनीचे 7 स्मार्ट फोन तर ओप्पो कंपनीचे 2 स्मार्टफोन ज्याची एकूण किंमत 1 लाख 2 हजार 226 रुपये होती. बालाजी ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक धर्मराज चव्हाण यांनी दि. 23 मार्च रोजी सायंकाळी वणी येथे नागपूर-मुकूटबन धनश्री ट्रॅव्हल्स (MH40Y6886) या ट्रॅव्हलचे वाहक अब्दुल रज्जाक यास पार्सल दिले.

रात्री गाडी मुकुटबन येथे पोहोचली. तातेड यांच्या भावाने पार्सलबाबत चालकास विचारणा केली असता बस वाहकास पार्सल बाबत विचारणा केली असता त्यांनी तुमच्या नावे कुणीतरी आधीच पार्सल घेऊन गेल्याचे सांगितले. अधिक विचारणा केली असता चालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे त्यांना लक्षात आले.

अखेर फिर्यादी यांनी मोबाईल पार्सल गहाळ केल्या प्रकरणी दि. 30 मार्च रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. वणी पोलिसांनी आरोपी धनश्री ट्रॅव्हल्स बसचा वाहक अब्दुल रज्जाक शेख इस्माईल (40), रा. पठाणपूरा वार्ड, चंद्रपूर विरुद्ध कलम 406 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रार देण्यासाठी फिर्यादीचे मुकुटबन ते वणी हेलपाटे
दि. 23 मार्च रोजी घडलेल्या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी फिर्यादी मुकुटबन पोलीस ठाण्यात गेला असता ठाणेदार अजित जाधव यांनी वणी पो. स्टे. मध्ये तक्रार देण्याचे सांगितले. फिर्यादी वणी पोलीस ठाण्यात गेला असता ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी घटना मुकुटबन ठाण्यात घडली म्हणून मुकूटबन ठाण्यात तक्रार नोंदवा असे सांगितले. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या आदेशाने वणी पोलिसांनी आज दिनांक 30 मार्च रोजी गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा:

यंदा जल्लोषात साजरा होणार श्रीराम जन्मोत्सव

कधी सापडणार संतोष गोमकर यांचे मारेकरी? काँग्रेसचा सवाल

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.