जब्बार चीनी, वणी: विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील अनेक शेतक-यांचा कापूस खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे घरामध्ये साठलेला आहे. आता कडक ऊन तापत आहे त्यामुळे सीसीआयने तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे अशा मागणीचे पत्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जिल्हाधिका-यांना आज दिले.
पत्रात म्हटले आहे की 15 मार्च पासून कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सुरक्षीततेच्या दृष्टीने सीसीआयने खरेदी केंद्र बंद केले आहे. त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उत्पादन झालेला चांगल्या प्रतीचा कापूस आजही शेतक- यांकडे शिल्लक आहे. हा कापुस घरातच आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने या कापसामुळे घरातील व्यक्तींना आजार होण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्याच्या प्रचंड उन्हामुळे घरातच आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे या पत्रात म्हटले आहे.
कापुस खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून बाजार समिती व सीसीआय यांना आदेश प्राप्त झाले आहे. पण प्रत्येक दिवशी फक्त 10 ते 20 गाडया मोजमाप कराव्या ( सोशल डिसटन्स च्या दृष्टीने ) असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच जिनिंग व्यवस्थापकावर याची जबाबदारी निश्चित केल्यामुळे भिती पोटी जिनिंग व्यवस्थापक जिनिंग उपलब्ध करुन देण्यास तयार नाही. तसेच सी.सी.आय.च्या वरिष्ठ अधिका-यांनी कापसाच्या रुईचे प्रमाण जिनिंग व्यवस्थापक व ग्रेडरवर निश्चित केल्यामुळे सीसीआयचा कापूस खरेदी करण्यास ग्रेडर तयार नाही.
मार्चपर्यंत पूर्वीच्या रुईच्या उता-याचे जे प्रमाण होते तेच प्रमाण आताही असावयास पाहिजे. कारण खरेदी सेंटर बंद झाले नसते तर मार्च पुर्वीच हा माल खरेदी झाला असता. शेतक-यांकडे असलेला कापुस जानेवारी फेब्रुवारी मध्ये असलेला माल आहे.
21 एप्रील रोजी पासुन बाजार समितीने शेतक – यांची नोदंणी सुरु केली . फक्त वणी बाजार समिती अंतर्गत ( वणी व शिंदोला ) येथील 7000 शेतक – यांनी नोंदणी केली तसेच पुन्हा जवळपास ऐवढेच शेतकरी शिल्लक आहे . खाजगी खरेदीदारांचा बाजार भाव प्रति क्विटंल 3500 ते 4000 आहे. आणि सि . सि . आय . चा भाव 5400 इतका आहे.
सि . सि . आय . ने कापुस खरेदी सेंटर सुरु केले नाही तर जवळपास 1500 ते 2000 फरकामुळे दिडशे ते दोनशे कोटीचे शेतक – यांचे नुकसान होईल अशा परस्थितीत शेतक – यांचा प्रचंड रोष व उद्रेक लोकप्रतिनिधी व प्रशासनावर होईल म्हणुन आपण तातडीने सि . सि . आय . चे खरेदी सेंटर सुरु करण्याबाबत निर्देश द्यावेत व किमान रोज 200 वाहन कापुस खरेदी ( प्रत्येक जिनात 25 वाहन ) सुरु करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.