सीसीआय कापूस खरेदी घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशीचे आदेश
वणी विभागात सर्वात जास्त खरेदी, ग्रेडर्ससह जिनिंग मालकही रडारवर
जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचे कापूस खरेदी तसेच प्रति क्विंटल कापूस मागे 2 ते 3 किलो रुईची घट दाखवून शासनाला करोडों रुपयांचा चुना लावल्या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सीसीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सिएमडी) पी.के. अग्रवाल यांनी शुक्रवारी चौकशीचे आदेश दिले.
सीसीआयचे ग्रेडर आणि जिनिंग प्रेसिंग मालकाच्या मिलीभगतने झालेल्या या घोटाळ्याची चौकशी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक (सीजीएम) संजय पाणीग्रही करणार आहे. सीसीआयच्या वणी केंद्रावर रेकार्ड 8 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यात बाहेर जिल्हा व तेलंगणा राज्यातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या चौकशीचे केंद्र बिंदू वणी केंद्र राहणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून नॉन एफएक्यू दर्जाचे कापूस खरेदी, दर क्विंटल मागे 2 किलो रुईचा कमी उतारा, जिनिंग संचालकांच्या हलक्या दर्जाची रुई गाठीची सीसीआयच्या चांगल्या गाठी सोबत अदलाबदली, सीसीआयच्या शिंदोला केंद्र वर लागलेल्या आगीची घटना, बाजार समितीचा सहभाग यासह ग्रेडर व जिनिंग मालकाची संपत्ती, खरेदी विक्री व्यवहार व बँक व्यवहाराची सखोल चौकशी केल्यास करोडो रुपयांचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.