चौपाटी बार फोडणा-यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
24 तासांच्या आत प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक
विवेक तोटेवार, वणी: वणीतील चौपाटी (मंजुषा) बार फोडणा-या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. घटना उघडकीस आल्याच्या केवळ 24 तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचे नाव सीताराम आसाराम भिसे (20) व सचिन राजू वायकर असून हे दोघेही गोकुळनगर येथे राहिवासी आहेत.
वणीतील तलाव रोड (लालगुडा) येथे मंजुषा बार आहे. वणीत हा बार चौपाटी या नावाने परिचित आहे. या बारमधून साडे सात पेटी विदेशी दारू चोरीला गेली होती. त्याची किंमत 37 हजार रुपये होती. चोरट्यांनी बारचे शटर फोडून आत प्रवेश केला व गोडाऊनचे कुलुप तोटून त्यात असलेल्या वेगवेगळ्या ब्रँडच्या विदेशी दारूच्या पेट्या लंपास केल्या. काल बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती.
बार फोडल्याची घटना उघडकीस येताच पोलिसांनी ताबडतोब तपासाचे चक्र फिरवले. त्यांच्या निशाण्यावर अवैध दारू विक्रेते होते. दरम्यान पेट्रोलिंग करताना पोलिसांना आरोपी परिसरात संशयास्पद फिरताना दिसले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरी 22315 रुपयांची दारू आढळून आली आहे.
आरोपीकडे या दारूबाबत चौकशी केली असता त्यांनी बार फोडल्याची कबुली दिली. तसेच ही दारू 4 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान चोरल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही दारू विक्रीसाठी चोरली असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक ,ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे व अमित पोयाम यांनी केली.
वणीतील चोरटे सापडले मग झरीचे का नाही?
अवघ्या चोविस तासांच्या आत पोलिसांनी धडाकेबाज काम करत आरोपीला गजाआड केले. त्याबाबत पोलिसांचे कौतुक होत आहे. मात्र झरी येथील राहुल बारमध्ये झालेल्या चोरीला आठ दिवस लोटले असले तरी अद्याप पाटण पोलिसांना आरोपींना अटक करता आलेली नाही. या बारचे आरोपीही अवैध दारू व्यवसायीकच असेल तर पोलिसांना आरोपी शोधणे कठिण का जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे वणी पोलिसांचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे पाटण पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे.