शेतकऱ्यांना गंडा घालणारा व्यापारी अखेर पोलीस ठाण्यात शरण

कोर्टाने नाकारली अटकपूर्व जामीन... अडीच महिने पोलिसांना दिला चकमा

जितेंद्र कोठारी, वणी : शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचा चुकारा थकवून फरार झालेल्या धान्य व्यापाऱ्यांनी सोमवार 18 एप्रिल रोजी अखेर पोलीस शरणागती पत्करली. धीरज अमरचंद सुराणा असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मागील अडीच महिन्यापासून फरार राहून अटकपूर्व जामीन मिळणेकरीता धावपळ करीत होता. मात्र कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

आरोपी धीरज अमरचंद सुराणा हा कृषी उत्पन्न बाजार समिती वणीमध्ये परवानाधारक धान्य खरेदीदार वर्धमान ट्रेडिंग कंपनीचा संचालक आहे. आरोपी यांनी 5 जानेवारी 2022 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत बाजार समिती ई नाम योजने अंतर्गत 147 शेतकऱ्यांकडून 1 कोटी 13 लाख 78 हजार 131 रुपयांचा 1935.02 क्विंटल सोयाबीन, चना व तूर शेतमाल खरेदी केला. मात्र ठराविक कालावधीत शेतकऱ्याचे चुकारे, बाजार फी, सुपरव्हीजन फी व अडतची रक्कम सदर व्यापाऱ्यांनी भरणा केली नाही.

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची रक्कमेसह 1 कोटी 15 लाख 26 हजार 46 रुपये थकविल्या प्रकरणी बाजार समिती सचिव अशोक काशिनाथ झाडे यांनी 28 फेब्रुवारी 2022 रोजी व्यापारी धीरज अमरचंद सुराणा व जामीनदार रुपेश नवरत्नमल कोचर विरुद्द वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी विरुद्द भादवी कलम 34, 406 आणि 420 अनव्ये गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला होता. तब्बल 78 दिवसाच्या फरारी काळात आरोपीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान वणी पोलीस आरोपीचा शोध घेण्यास सपशेल अपयशी ठरली. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आरोपी सोमवार 18 एप्रिल रोजी वणी येथे आपल्या घरी परतला. कुटुंबीयांनी समज दिल्यानंतर आरोपी धीरज सुराणा हा आपल्या मित्र श्रीकांत सोनटक्के यांच्या दुचाकीवर बसून पोलीस स्टेशनमध्ये आला व स्वतःहून अटक करुन घेतली.

आरोपी धीरज सुराणा यांनी वर्धमान ट्रेडिंग कम्पनीच्या नावावर सहकारी व खाजगी बाजार समितीमध्ये खरेदी केलेले तब्बल 2 कोटी 42 लाख 26 हजार 784 रुपयांचा शेतमाल कोचर ट्रेडिंग कम्पनीला विकले. कोचर ट्रेडिंगचे मालक रुपेश नवरत्नमल कोचर यांनी शेतमाल दुसऱ्या व्यापाऱ्या विकून रक्कम उचलली. मात्र धीरज सुराणा याला 13 जाने.2022 रोजी आरटीजीएसद्वारे 10 लाख रुपये दिले. रुपेश कोचर यांनी 2 कोटी 32 लाख 26 हजार 784 रुपये हडपल्याची तक्रार फिर्यादी धीरज सुराणा यांनी 8 फेब्रुवारी 2022 रोजी स्पीडपोस्ट मार्फत ठाणेदार, पो.स्टे. वणी, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वणी यांच्याकडे पाठविली. मात्र त्या तक्रारीची कुठेही दखल घेण्यात आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.