जब्बार चीनी, वणी: करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहरात ‘लॉकडाऊन’ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. वणी पोलीस स्टेशनने यवतमाळ व नागपूररोडवर महिनाभरापूर्वी ‘चेकपोस्ट’ उभारण्यात आले आहे. तसेच गावात येणारे अन्य रस्ते बंद केले आहेत. सर्वात आधी ‘चेकपोस्ट’वरून शहरात प्रवेश करणा-यांचे तापमान ‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ने तपासण्यात येत आहे. एखादा संशयित व्यक्ती आढळल्यास त्याला त्यात्काळ कोविड केअर सेंटर परसोडा येथे तपासणीसाठी पाठविले जात आहे.
वणी पोलीस स्टेशनतर्फे सुरू असलेल्या या उपक्रमासाठी ‘इन्फ्रा रेड थर्मामीटर’ वापरा बाबतची माहिती तथा मार्गदर्शन ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक गोफने यांनी केले. कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या जीवघेण्या परिस्थितीत पोलीस कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य पार पाडीत आहे. पोलिसांना तपासणी करणे शक्य व्हावे म्हणून दोन इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
चेकपोस्टवर किंवा पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा कितीही काळजी घेतली तरी आजारी व्यक्तींशी थेट संपर्क होतो. हा संपर्क पोलिसांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने सुरक्षीत अंतरावरून शरीराचे तापमान मोजण्यासाठी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे यंत्र वापरण्यासाठी जुजबी प्रशिक्षण लागते ते पोलिसांना ग्रामीण रूग्णालया तर्फे देण्यात आले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी देशात युद्ध पातळीवर संघर्ष सुरू आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी लढा देत आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा शहरात शिरकाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन दिवस रात्र पहारा देत आहेत. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 20 कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी सतत नाकाबंदी करीत आहेत. कर्मचारी रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्र ही विचलित होतानाही दिसत नाही. त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण वणी तालुक्यात ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात तसेच कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
कोरोनाला चेकपोस्टवरच रोखण्याचा प्रयत्न – वैभव जाधव
नागपुर व यवतमाळ दोन्ही रस्त्यावर उभारलेल्या ‘चेकपोस्ट’वर बाहेरून आलेल्या नागरिकांना थांबविले जाते. त्यांची नावनोंदणी केली जाते. कोठे जायचे हे विचारले जाते. बाहेरुन येणा-या नागरिकांची ‘चेकपोस्ट’वर थर्मामीटरने तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस स्टेशन ला सुद्धा एक इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे कोरोनाला चेकपोस्टवरच रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
– वैभव जाधव, ठाणेदार वणी पोलीस स्टेशन